अमरावती / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी योग्य वेळेला योग्य गोष्ट करणे उचित आहे. असे केले तर विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये लवकर यशस्वी होऊ शकतात. मी सर्वसामान्य परिस्थिती मधून पोलीस अधीक्षक या पदापर्यंत पोहोचलो त्याला कारण मी योग्य वेळी योग्य कामे केली. विद्यार्थी वर्गाने आपली दिशा निश्चित केली आणि रोजचे काम रोज केले तर असे विद्यार्थी जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात असे प्रतिपादन लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर यांनी आज अमरावती जवळील वलगाव येथील सिकची रिसॉर्ट मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी, प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन तर्फे आयोजित सात दिवशीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई ईटणकर ह्या होत्या. त्यात प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वक्ते श्री राजेश चव्हाण मुंबई, एजाज शेख जळगाव,मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व कवी श्री भारत सातपुते लातूर, मिशन आय ए एस चे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे मिशन आयएएसए विविध पदाधिकारी विचार पिठावर उपस्थित होते.
श्री बापू बांगर यांनी आपल्या भाषणामध्ये स्पर्धा परीक्षा कशा प्रकारे द्याव्या याचे सविस्तर मार्गदर्शन केले सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. खरं म्हणजे शिक्षण सेवक व नंतर शिक्षक झाल्यानंतर त्यांचे आयुष्य सुरळीत सुरू होते पण त्यांनी हार मानली नाही ते पोलीस उपनिरीक्षक परीक्षेला बसले त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी या परीक्षेला बसले आणि दोन्हीही परीक्षेमध्ये गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन आज अमरावती विभागाचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून ते काम करीत आहेत.
मी माझा रोजचा अभ्यास रोज करायचा याशिवाय मला उद्या काय करायचे आहे त्याचे होमवर्क देखील मी अगोदरच करून ठेवत असे त्यामुळे मी ही प्रगती करू शकलो.
याप्रसंगी श्री बापू बांगर यांना डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमी चे रौप महोत्सवी सन्मानचित्र माननीय श्रीमती शारदाताई इटणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री भारत सातपुते व श्री राजेश चव्हाण यांनाही स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा श्री बांगर यांनी सत्कार केला.
================
महोदय प्रकाशनार्थ
