*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तृष्णा* (चरणपूर्ती)
बाल्य गेले यौवन सरले जरा प्राप्त झाली
मायेच्या जंजाळी मी तर पुरता अडकलो
किती धावलो मृगजळाच्यापाठी मी हा असा
*तृष्णा नाही जीर्ण जाहली जीर्ण जरी जाहलो*
काय कल्पना असे सुखाची मज नाही कळले
घरात हसरे तारे असता नाही विसावलो
अमृताचे घट भरलेले दुर्लक्षित राहिले
*तृष्णा नाही जीर्ण जाहली जीर्ण जरी जाहलो*
कधी न केला नामजप मी एकाग्र मनाने
क्षणभर नाही देवापाशी ध्यानस्थ बसलो
लोभ मोह या रिपुंनी केले राज्य मजवरी
*तृष्णा नाही जीर्ण जाहली जीर्ण जरी जाहलो*
होतो वाचत संतोपदेशा गीता गाथेतुनी
पालथ्या घागरीवरी पाणी सदा भरकटलो
हाती न आले काही माझ्या धाव धाव धावलो
*तृष्णा नाही जीर्ण जाहली जीर्ण जरी जाहलो*
आयुष्याचे दिन हे गेले भजनाविण सारे
चंचल चित्ता सावरताना सत्यासी मुकलो
कैसे तुटती मोहपाश हे कसे मुक्त व्हावे
*तृष्णा नाही जीर्ण जाहली जीर्ण जरी जाहलो*
*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन*