*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांज दुलई पांघरून…!*
सोन झळाळीत
सांज दुलई पांघरून
वाट सजवून
उतरली…!
निळ्या,जांभळ्या
सांज छायेत उतरून
नाद झंकारून
आली…!
घननीळ सांजेने
असे स्वर्ण ओकले
लुटून घेतले
मीही…!
अंतरातील तेज
जणू सांजेत चमकले
आठवांसवे उतरले
चांदणे…!
कुणी नसावे
असा लाभला संग
होत दंग
सांजभुलीत…!
चमकत्या चांदण्या
जणू उतरल्या पर्या
निनादल्या झांजर्या
स्वप्नात…!
प्रीतीच्या दालनात
घातल्या पायघड्या हृदयाच्या
रेशिमगाठी जन्माच्या
समजून…!
स्वप्नात उतरली
सांज दुलई पांघरून
रंग लेवून
वेडे…!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
