*सूरमयी साहित्य समूह सदस्य लेखक कवी जोतिबा पाटील लिखित अप्रतिम लेख*
*गाव … मनाला पुन्हा जगायला शिकवते..!*
काही दिवसांच्या सुट्टीसाठी गावी गेलं की, मनाला एक वेगळीच शांतता लाभते. शहराच्या धावपळीमध्ये हरवलेला जीव जसा पुन्हा स्वतःला शोधतो, तसं काहीसं गावात पाऊल टाकताच जाणवतं. आईच्या मायेचा स्पर्श, घराच्या उंबर्याची ऊब आणि मातीचा दरवळणारा सुगंध हे सगळं मनाला पुन्हा नव्याने जिवंत करतं.
आईची माया, तिचं प्रेम, तिची काळजी या गोष्टी शब्दांत मावणाऱ्या नाहीत. तिच्या हातची भाकरी, प्रेमाने केलेली विचारपूस आणि “थकलास का रे?” म्हणणारा तिचा स्वर यातच संपूर्ण जगाचं सुख दडलंय. भाऊ , बहिण,मित्र परिवार आणि नातलग त्या चार भिंतींमध्ये फक्त घर नसतं, तर प्रेम, आपुलकी आणि संस्कारांची उबदार सावली असते. त्या भूमीतूनच माणुसकीचं रोपटं उगवतं आणि आयुष्याला जगण्याची खरी दिशा मिळते.
गावी आलं की कामाचा ताण, धावपळ, चिंता सगळं कुठेतरी मागे राहतं. मन अगदी मुक्त होऊन जातं. स्वतःच्याच जगात आपण राजे असल्यासारखं वाटतं. मित्र सवंगडी भेटतात, गावकरी प्रेमाने विचारपूस करतात. “कधी आलास?”, “किती दिवस राहणार?” या साध्या प्रश्नांमध्येही मायेचा ओलावा असतो. ती नाती कुठल्याही दिखाव्याची नसतात; ती मनाने जोडलेली असतात. नकळत एक रेशीमगाठ मनाशी बांधली जाते.
गावची सकाळ तर स्वर्गीयच असते. पक्ष्यांचा किलबिलाट, कोवळ्या सूर्यकिरणांची चाहूल, ढगांची गर्दी, कधी अचानक येणारा अवकाळी पाऊस — निसर्गाचं प्रत्येक रूप मनाला सुखावून जातं. त्या वातावरणात दिवस कसा सरतो हे समजतही नाही.
यावेळी गावात लग्नसराईची धामधूम होती. हळदीपासून ते वरातीपर्यंत सगळं वातावरण आनंदाने भारलेलं होतं. मंडप उभारण्यापासून ते जेवणाच्या व्यवस्थेपर्यंत प्रत्येक जण मनापासून काम करत होता. मित्रमंडळी, नातेवाईक, गावकरी सगळेच एकमेकांसाठी धावपळ करत होते. गाण्यांच्या तालावर रंगलेला उत्साह, वरातीतला बेभान नाच आणि चेहऱ्यावरचा आनंद हे अनुभव शब्दांच्या पलीकडचे होते.
शहरात मोठमोठे कार्यक्रम पाहायला मिळतील, पण गावातल्या लग्नातील ती आपुलकी, तो जिव्हाळा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची पद्धत कुठेच मिळणार नाही. तेरा चौदा दिवस कधी संपले हेच कळलं नाही. प्रत्येक क्षण मनात कोरला गेला.
गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही,गाव म्हणजे मायेची सावली, संस्कारांची शाळा, नात्यांची वीण आणि मनाला पुन्हा जगायला शिकवणारा स्वर्ग…!
स्वच्छंद पाखरू…!
जोतिबा पाटील,कांदबरी
