You are currently viewing अधिक मास म्हणजे?

अधिक मास म्हणजे?

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अधिक मास म्हणजे?*

 

 

अधिक मास म्हणजे श्वास निवांत काळाचा

मनातील गाभार्‍यात उमटणारा विश्वास,

धावणार्‍या दिवसांना मिळालेला थोडा विराम

अंतर्मनाशी नव्याने जुळणारा सहवास..

 

अधिक मास म्हणजे नसे तिथींची बेरीज

आत्मपरीक्षणास तो शांत गहिरा पाही,

लोभाच्या या गर्दीमध्ये हरवलेल्या माणसाला

स्वत:च्या अस्तित्वाची पुन्हा जाणीव होई..

 

अधिक मास म्हणजे दानधर्माचा दीप उजळत

वेदनांच्या वाळवंटात करुणेचे फूल फुलणे,

दारी येणार्‍या प्रत्येक भुकेल्या डोळ्यांना

आपुलकीच्या घासातून देवत्व भेटणे..

 

अधिक मास म्हणजे नव्हे फक्त उपवास

वासनांच्या वादळावर तो संयम आणतो,

मनातल्या विकारांना शांत करणार्‍या साधनाने

आत्ममंदिरात भक्तीचे नवे स्वर घुमवतो..

 

अधिक मास म्हणजे नव्हे पुराणिक कथा

संस्कृतीच्या मुळांना सशक्तपणे जपतो,

पिढ्यानुपिढ्या वाहणार्‍या श्रद्घेच्या नदीला

नव्या जाणिवांचे पवित्र क्षण देतो..

 

अधिक मास म्हणजे जगण्याचा अंतरी अर्थ

माणुसकीच्या ओंजळीतील ईश्वराचा स्पर्शार्थ,

क्षणभंगुर आयुष्याला शाश्वतता देणारा

कालचक्रामधला शांत, सुवर्णी परमार्थ..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा