You are currently viewing पत्रकारांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नाला आकार
Oplus_16908288

पत्रकारांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नाला आकार

सिंधुदुर्गनगरीत उद्या ‘दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे भूमिपूजन

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; पत्रकारांच्या पाल्यांचा होणार गौरव

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पा’चे भूमिपूजन रविवारी दि. १७ मे रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यास खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, मराठी पत्रकार संघटनेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमासोबतच सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलनही आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध लोककला गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांसह त्यांच्या पत्नी व मुलांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना जिल्ह्यातील पत्रकार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा