कुणकेश्वरात रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’; कोकण पर्यटनाला मिळणार नवी झळाळी
‘फार्म टू टेबल’ संकल्पनेतून हापूस थेट ग्राहकांपर्यंत; दशावतार, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
देवगड
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे १५ ते १८ मे २०२६ या कालावधीत भव्य ‘आंबा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश कोकणातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक सांस्कृतिक वारशाचा प्रसार करणे हा आहे.
या महोत्सवात ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेतून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आपला हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे. पर्यटकांना अस्सल हापूससह कोकणातील विविध स्थानिक उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात फळांचा राजा आंब्यासोबतच कोकणच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान आणि कोकण कलेक्टिव्ह बँड यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवानिमित्त कुणकेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना परिसरातील ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य समुद्रकिनारे तसेच तारकर्ली बीच येथे स्कुबा डायव्हिंग आणि डॉल्फिन सफारीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग चिपी विमानतळ तसेच कणकवली रेल्वे स्थानक मार्गे सुलभ प्रवास व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
