कणकवलीत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
ग्रामपंचायतींनी टॉर्च, लाईफ जॅकेटसह अत्यावश्यक साहित्य सज्ज ठेवावे; गैरहजर अधिकाऱ्यांवर अहवाल देण्याचा प्रांताधिकाऱ्यांचा इशारा
कणकवली
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन ही केवळ महसूल विभाग किंवा तालुका प्रशासनाची जबाबदारी नसून ग्रामपंचायतींनीही गावपातळीवर आवश्यक उपाययोजना तत्परतेने कराव्यात, असे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींकडे टॉर्च, कटर, लाईफ जॅकेट, दोरखंड यांसारखे साहित्य उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. बैठकीला काही विभाग प्रमुख अनुपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करणार असल्याचेही श्री. कातकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. साईड पट्ट्यांची दुरुस्ती, रम्बलर बसविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे तसेच धोकादायक झाडांच्या फांद्या व बॅनर हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नडगिवे येथे रम्बलर बसवण्याचे काम सुरू असून कणकवलीतही लवकरच ते करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कासार्डे ओव्हरब्रिजवरील कोसळलेल्या प्लास्टरबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायत विभागाला पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जीर्ण शाळांची तातडीने दुरुस्ती व निर्लेखन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. पुराचा धोका निर्माण झाल्यास स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे निर्णय स्थानिक प्रशासनाने तातडीने घ्यावेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याची गरज नसल्याचेही श्री. कातकर यांनी सांगितले.
गावपातळीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तहसील कार्यालय किंवा पोलिसांशी संपर्क करणे आवश्यक असले तरी प्रथम प्रतिसाद देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यकतेनुसार तालुका प्रशासनाकडून मदत दिली जाईल, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महावितरणच्या आढाव्यात अलीकडील वादळी पावसामुळे खारेपाटण व चिंचवली परिसरातील खंडित वीजपुरवठ्याबाबत चर्चा झाली. अशा परिस्थितीत तत्काळ अपडेट देणे, मनुष्यबळ वाढविणे व तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बीएसएनएलच्या यवतेश्वर येथील टॉवरसाठी जागा निश्चित न झाल्याने तो सुरू करता येत नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
कृषी विभागाने मंडळ स्तरावर स्वयंचलित पर्जन्यमापक बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. फोंडाघाट येथील नवीन जागेत पर्जन्यमापक बसविण्यात आला असून अन्य तीन मंडळांतही लवकरच कार्यवाही होणार आहे. आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालयातील औषधसाठा आणि साथीच्या रोगांबाबतच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला.
दरम्यान, कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील ४० गटारांपैकी २६ गटारांची साफसफाई पूर्ण झाली असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी श्री. अगम यांनी दिली. आचरा रोडवरील खड्ड्यांचे काम अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईची वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करून यंत्रणा सतर्क ठेवाव्यात, अशा स्पष्ट सूचना प्रांताधिकारी श्री. कातकर यांनी बैठकीत दिल्या.
