You are currently viewing कुठे झालंय माझं वय

कुठे झालंय माझं वय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*कुठे झालंय माझं वय*

 

विंटर संपून नुकताच स्प्रिंग सुरू झाला. तापमानात थोडी वाढ झाली, त्यामुळे इतके महिने घरात बसून कंटाळलेली मी आज जरा चालायला जाऊया या विचाराने बाहेर पडले. एखाद किलोमीटर चालले असेन नसेन, ” अरुणा” अशी हाक मला ऐकू आली. वळून पाहते तर माझी मैत्रीण जया मागे उभी. ” काय ग अरुणा,तुझ्या नातीच्या लग्नात तुम्ही दोन्ही आज्यांनी केलेला डान्स मी पाहिला. अगं तू माझ्याच वयाची ना? इतकी कशी नाचलीस? ”

” वयाचा आणि नाचण्याचा काय संबंध?” मी तिला विचारले. ” वय काय ग रोजच वाढत असतं एकेक दिवसाने. मन किती ताजं आहे त्यावर अवलंबून असतात सगळ्या गोष्टी. ”

 

नातीचे लग्न पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात आला याने मी फार सुखावले होते. आज-काल टीव्ही सिरीयल्समुळे आणि बॉलीवूड मुळे लग्न समारंभ म्हटला की हळद, मेंदी ,संगीत अशा इव्हेंट्सचे प्रस्थ फार वाढले आहे. आमच्या घरातील तरुण पिढीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? सगळे इव्हेंट्स अगदी दणक्यात साजरे करण्याची तयारी चालू होती. मी आणि माझी विहीण, आम्हा दोन आज्यांना या तयारीत कोण सामावून घेते? कोणाला कसलीही कल्पना न देता आम्ही दोघी विहिणींनी ठरवले की व्हिडिओ बघून आपण आपला डान्स बसवायचा आणि सगळ्यांना धक्का द्यायचा. मनात जिद्द असली ना की वयाचा विसर पडून कोणतीही गोष्ट करणे अगदी सहज शक्य होते. दोनशे लोकांसमोर केला की हो आम्ही नाच. अगदी तालासुरात, गिरक्या घेऊन……. कुठे झालं होतं आमचं वय?

 

शोभा गुर्टूंनी गायलेली आणि गाजलेली अशी एक बैठकीची लावणी आहे. त्यातील *पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा* ही ओळ मला मनापासून पटते आणि आवडते सुद्धा. मन जर तरुण असेल तर काहीही करणे सहज शक्य आहे.

 

लहान मुलांत मिसळून मूल व्हावे, तरुणांच्या समवेत तरुण व्हावे, आणि जेष्ठांच्या सोबत राहून त्यांच्या मनातील वाढत्या वयाची चिंता मिटविण्यासाठी वय विसरून मस्त मजा करावी, एकत्र येऊन गाण्याच्या भेंड्या खेळाव्या, सहल काढावी, सामूहिक वाचन करावे, एखाद्या दिवशी सहभोजन करावे. मग असेच म्हणावेसे वाटेल की कुठे झालं माझं वय?

 

आंतरजालाच्या सहाय्याने आपण साहित्यिक समूहावर एकत्र येतो. विविध विषयांवर कविता,लेख, कथा लिहितो. शृंगारिक लेखन करताना तारुण्यातील भावना व्यक्त होतात. बालगीते,बालकथा लिहिताना बालाहूनही बाल होतो. कित्येक वेळा गतस्मृतीत हरवून जातो. अशावेळी वयाचा काही संबंध असतो का? मग माझं वय झालं असं का म्हणावं?

 

एकदा का शाळा -कॉलेज संपून आपण बाहेर पडलो की मित्र-मैत्रिणी दुरावतात. कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात, कोणी नोकरीच्या निमित्ताने आणि विशेष करून मुली लग्नानंतर कुठे कुठे जातात. संसारात रममाण झाल्यावर कोण कुठे आहे याची काहीच खबरबात नसते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात परिस्थिती बदलली आहे. फेसबुक, व्हाट्सॲप वगैरे सोशल मीडिया द्वारे संपूर्ण जग फार जवळ आले आहे. आता मुला मुलींचे स्कूल -कॉलेज रियुनियन सर्रास चालू असते. एक दिवस ठरवून कुणाच्या फार्म हाऊस वर किंवा अशाच कोणत्यातरी चांगल्या जागेवर भेटायचे आणि वर्तमान काळ विसरून मुक्तपणे भूतकाळ जगायचा. फुलपाखरू होऊन स्वच्छंद उडायचे, जीवनातील अमृतकण प्राशन करायचे. अशावेळी वयाचा प्रश्न येतोच कुठे?

 

जन्म ते मृत्यू या आयुष्यात जे अनेक टप्पे येतात, चढ- उतार येतात त्यांना सामोरे जाताना जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत मला जगायचे आहे असा विचार मनाशी ठाम बांधून ठेवला तर वय नावाचा अडसर कधीच येणार नाही आणि म्हणावेसे वाटेल कुठे झाले माझे वय?

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा