वारडकर येथे दुर्दैवी घटना
शौचालयाच्या टाकीची फरशी फुटून सुवर्णा मांजरेकर यांचा मृत्यू
कुडाळ
वारडकर येथील सुवर्णा सुरेश मांजरेकर (वय ६५) यांचा आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. घराजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीची फरशी अचानक फुटल्याने त्या थेट टाकीत कोसळल्या. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा मांजरेकर या सकाळी घराजवळ पडलेला आंबा उचलण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शौचालयाच्या टाकीवर टाकण्यात आलेली फरशी अचानक तुटली आणि त्या थेट आत पडल्या. हा प्रकार इतक्या अचानक घडला की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वारडकर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः जुन्या व जीर्ण अवस्थेतील शौचालय टाक्या आणि त्यावरील कमकुवत फरशांमुळे मोठा धोका निर्माण होत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे.
सुवर्णा मांजरेकर यांच्या पश्चात पती सुरेश मांजरेकर असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मांजरेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
