*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या पुस्तकांच्या सरणावरती*
*माझा देह जळावा…*
मी गेल्यावर…
माझ्या कथा,कविता
कोणी जपणार नाहीत कदाचित…
मी लिहिलेल्या त्या कागदांना
कोणी हळुवार स्पर्शही करणार नाही.
मला मिळालेल्या सन्मानाचं
कुणाला फारसं कौतुकही नसणार,
पण मी गेल्याचं दुःख
माझ्या कवितांनाही नक्कीच असणार…
ज्या कागदांवर मी जगलो,
जिथे माझं मन ओतलं,
त्या शब्दांच्या जाणिवांतूनच
माझं अस्तित्व फुलत गेलं.
कधीतरी माझी एखादी वही उघडाल,
तेव्हा एखादं पान शांतपणे रडताना दिसेल…
माझ्या आठवणीत
प्रत्येक अक्षर हुंदका देत असेल…
कारण माझ्या शब्दांनीच मला
मानसन्मान दिला,
माझ्या कविता आणि पुस्तकांनीच
मला जिवाभावाचा गोतावळा दिला.
म्हणून एक विनंती आहे…
मी गेल्यावर एवढंच करा—
माझ्या कपाटातल्या प्रत्येक वहीला
माझ्या छातीशी ठेवून द्या…
माझी प्रत्येक कविता
माझ्यासोबत जळताना पाहू द्या…
माझ्या कवितानीच मला
शेवटचं उबदार कवटाळावं,
माझ्या पुस्तकांच्या सरणावरती
माझं शरीर शांत जळू द्यावं…
आणि राख झाल्यावर
एक विनंती वाऱ्यालाही सांगावी
माझ्या शब्दांची धूळ होऊन
प्रत्येक मनात कविता रुजावी…
मी खूप काही लिहिलं,
कारण माझ्या कवितांनीच मला जगवलं…
माझ्या अस्थी विसर्जित करताना
फक्त एवढंच बोला—
“माणूस मरताना रिकाम्या हाताने जातो म्हणतात,
पण हा माणूस शब्दांचं धन सोबत घेऊन गेला…”
तेव्हा मी नसताना
माझी एकही आठवण राहु नये
माझी एकही कविता पोरकी होऊ नये,
म्हणून म्हणतो—
लाकडांच्या निर्जीव राशी
माझ्यासाठी रचू नका…
माझ्या अक्षरांच्या पानांनीच
मला शेवटचा अग्नी द्याल का… तुम्ही ?
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
📞 ९५७९११३५४७
📞 ९४२२८९२६१८
