You are currently viewing चैतन्य मूर्ती

चैतन्य मूर्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*‘ चैतन्य मूर्ती ‘*

 

रूप ईश्वरी जीवनदायी आई असते

तिच्या अंतरी वात्सल्याची सरिता वसते ||

 

सर्वस्वाची करिते उधळण कुटुंबावरी

घारीसम ती लक्ष ठेविते अपत्यांवरी ||

 

गणती नाही वेदना किती सोशिल्या तिने

लेकरास पण आरोग्याचे देतसे जिणे ||

 

घरातील ती चैतन्याची असते मूर्ती

प्रत्येकाच्या श्वासांनाही मिळते स्फूर्ती ||

 

शिकवण मोठी संस्कारांची ऋण आईचे

तिच्यासारखे वागुनिया ते फेडायाचे ||

 

मायेचा ती हात फिरविता सरे वेदना

मळभ निवळते उदासवाणे शांतवी मना ||

 

आईसम ती आई असते जगात अवघ्या

देवानंतर सदैव असते ती आराध्या ||

 

*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा