You are currently viewing वेंगुर्ल्यात २० ते २२ मे दरम्यान भव्य सांस्कृतिक महोत्सव

वेंगुर्ल्यात २० ते २२ मे दरम्यान भव्य सांस्कृतिक महोत्सव

वेंगुर्ल्यात २० ते २२ मे दरम्यान भव्य सांस्कृतिक महोत्सव

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; २४ ते २६ मे ‘मराठी चित्रपट महोत्सवा’चेही आयोजन

वेंगुर्ले :

वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त दि. २०, २१ व २२ मे रोजी वेंगुर्ले येथे भव्य “सांस्कृतिक महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय विभागामार्फत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन बुधवार दि. २० मे रोजी सायंकाळी ७.३० वा. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच दि. २४, २५ व २६ मे या कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे ‘मराठी चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी विशेष सभेत दिली.
वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोभायात्रा, लोककला आणि चित्ररथ स्पर्धेचे आकर्षण
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर महोत्सवाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. वेंगुर्ला नगरपरिषदेला १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून त्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महोत्सवानिमित्त दाभोली नाका ते नगरपरिषद स्टेडियमपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून चित्ररथ स्पर्धा, कळसूत्री बाहुल्यांचे कार्यक्रम, संयुक्त दशावतार, स्थानिक कलाकारांचे लोककला सादरीकरण तसेच लोककलांवर आधारित नामवंत गायकांचा आर्केस्ट्रा हे कार्यक्रम रंगणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, मुख्याधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपालिकांचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
१५० वर्षांच्या इतिहासाचे पुस्तक व डॉक्युमेंटरी सादर होणार
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वेंगुर्ला शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासावर आधारित विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याचबरोबर शहराच्या ऐतिहासिक प्रवासाची माहिती देणारी डॉक्युमेंटरीही सादर केली जाणार आहे.
‘मराठी चित्रपट महोत्सवा’त उत्कृष्ट ८ चित्रपटांचे प्रदर्शन
दि. २४, २५ व २६ मे दरम्यान आयोजित ‘मराठी चित्रपट महोत्सवा’त उत्कृष्ट ८ मराठी चित्रपटांचे मोफत प्रदर्शन करण्यात येणार आहे. चित्रपट निवडीसाठी चार समित्यांची स्थापना करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
कॅम्प क्रीडांगण नगरपरिषदेकडेच राहणार
३० वर्षांच्या भाडेकराराचा निर्णय; शहर विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन
वेंगुर्ला कॅम्प येथील क्रीडांगण नगरपरिषदेकडेच देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला असून यासाठी ३० वर्षांचा भाडेकरार करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.
जिल्हाधिकारी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून सर्वांनी एकत्र येऊन वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा क्रीडा केंद्रासाठीही पर्यायी जागेची निश्चिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नाम फाउंडेशन मार्फत शहरातील ओहोळांचा गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिवाजी प्रागतिक शाळेसंदर्भातील मुद्द्यावर संबंधित विभागाशी पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा