न्यू इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा होणार सत्कार
फोंडाघाट :
न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच शाळेतील शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांनी दिली.
यंदा शाळेने तब्बल ९९.९ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या भरघोस गुणांमुळे संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला विशेष तेज प्राप्त झाले आहे. “पुढील वर्षी १०० टक्के निकाल आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन संस्थेचा सुवर्णमहोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल,” असा विश्वासही नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
“या प्रशालेत आम्ही शिकलो, घडलो आणि पदाधिकारी झालो. त्यामुळे या शाळेबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो,” असेही त्यांनी सांगितले.
शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने कटाक्षाने लक्ष ठेवणारे मित्र रंजन नेरुरकर, बबन पवार, शेखर आण्णा, राजू पटेल, सचिन तायशेटे, आनंद मर्ये तसेच सर्व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशामागे मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचेही विशेष कौतुक करून अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
