आदिवासी समाजाला सन्मानाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन; आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग
आदिवासी समाजाच्या गरजा आणि समस्या समजून घेऊन त्यांना सन्मानाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आणि विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १४ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार (महसूल) चैताली सावंत, नोडल अधिकारी विशाल घोरपडे, नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहायक महसूल अधिकारी मनिषा खानोलकर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची आणि योगदानाची माहिती दिली.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा केला जातोय. भारतीय लोकसंख्येत आदिवासी समाजाचे प्रमाण सुमारे ९ टक्के असून, या समाजाची स्वतंत्र बोलीभाषा, चालीरीती, परंपरा आणि समृद्ध संस्कृती आहे. निसर्गाशी घट्ट नाते जोडलेला आणि निसर्गालाच देव मानणारा हा समाज आहे. आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीचा आणि त्यांच्या परंपरांचा जवळून परिचय करून घेताना अनेक प्रगतिशील विचार अनुभवायला मिळतात.
आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना या समाजाचे जीवन, त्यांच्या समस्या आणि संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्पनिहाय कामकाज चालते. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रकल्प कार्यालयांची निर्मिती करून त्यांना निधी उपलब्ध करून दिला जातो. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, निवासी वसतिगृहे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था अशा विविध शैक्षणिक सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. भारतीय संविधानाने अनुसूचित जमातींसाठी आरक्षणासह विशेष तरतुदी केल्यामुळे या समाजाला शिक्षण आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच आदिवासी समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्यासाठी संघर्ष केला. अल्पशा आयुष्यात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आदिवासी समाजात एकोपा निर्माण करण्यास आणि स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांचे कार्य आजही आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृती आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी जनजातीय गौरव दिन साजरा केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातकरी समाजाची वस्ती आहे. या समाजाच्या गरजा, अडचणी आणि समस्या समजून घेऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाचे न्याय्य हक्क, सन्मान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांना प्राधान्य देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
