You are currently viewing सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; मोफत शस्त्रक्रियांबाबत जनजागृती

सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; मोफत शस्त्रक्रियांबाबत जनजागृती

सावंतवाडी येथे महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; मोफत शस्त्रक्रियांबाबत जनजागृती

सावंतवाडी –

अथायु मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय, कोल्हापूर (विमानतळ शेजारी) व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 15 नोव्हेंबर रोजी महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

दीपप्रज्वलन करून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र (राजू) मसुरकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी कोल्हापूर अथायु रुग्णालयाचे डॉ. राहुल चौगुले, कॅम्प संयोजक किरण पाटील, निवृत्त महाराष्ट्र परिवहन मंडळाचे वरिष्ठ लिपिक राम वाडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील कोरगावकर, सावंतवाडी तालुका सामाजिक संयोजक संजय तानावडे, सामाजिक संयोजक ओमकार पडते, अथायु मल्टी स्पेशालिस्ट संयोजक दिनेश दावले तसेच रुग्ण व नागरिक उपस्थित होते.

*मोफत शस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शन*

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. राजू मसुरकर यांनी सांगितले की, अथायु मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय, कोल्हापूर येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत – महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, औषधे व जेवण मोफत दिले जाते.

या योजनेत खालील शस्त्रक्रिया मोफत होतात :
– हृदयाची अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी
– 4 इंचाची स्कोपीद्वारे कमी रक्तस्त्रावात हृदयाची शस्त्रक्रिया
– हृदयाचा वॉल बदलणे, पेसमेकर शस्त्रक्रिया
– मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशय शस्त्रक्रिया
– कॅन्सर शस्त्रक्रिया व केमो
– हाडांची शस्त्रक्रिया, पायाची व्हेरिकोज व्हेन्स शस्त्रक्रिया

*योजनेचा इतिहास*

मसुरकर यांनी सांगितले की, 2011-12 मध्ये काँग्रेस सरकार असताना ही योजना फक्त 8 जिल्ह्यांपुरती होती. उर्वरित 28 जिल्ह्यांना ही सुविधा मिळावी म्हणून त्यांनी अनेक नेत्यांना निवेदने दिली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सावंतवाडी राजवाडा येथे कै राजमाता राणी सत्वशीला देवी भोसले यांच्या भेटीसाठी आले असताना मसुरकर यांनी त्यांना निवेदन देऊन आग्रह केला. त्यामुळे केवळ एका महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना मंजूर झाली आणि तेव्हा तिचे नाव ‘राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना’ असे होते.

त्यावेळी पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशन कार्ड व आधार कार्डधारक अशा 14 कोटींपैकी 12 कोटी जनतेला लाभ देण्यात सन्मानीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री यांनी देण्यात आला होता. त्यात 1 लाख 50 हजार रुपये, तर किडनी शस्त्रक्रियेसाठी 2 लाख 50 हजार रुपये मंजूर होते.

2017 नंतर सरकार बदलल्यावर योजनेचे नाव ‘महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना’ झाले. आता ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत – महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजना’ अंतर्गत दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो.

महाराष्ट्रात सध्या 2399 प्रकारच्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात, तर 116 प्रकारच्या छोट्या शस्त्रक्रिया व उपचार शासकीय रुग्णालयात मोफत दिले जातात. राज्यात एकूण 1400 खाजगी रुग्णालये या योजनेशी जोडलेली आहेत.

*कार्ड काढणे आवश्यक*

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत – महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य कार्ड शासकीय रुग्णालयातून काढणे आवश्यक आहे. कार्ड नसेल तर लाभ मिळत नाही, याबाबत सर्व नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन मसुरकर यांनी केले.

अधिक माहितीसाठी शासनाचा टोल फ्री क्रमांक : *1800 233 2200*
या क्रमांकावर आजाराप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात कोणते रुग्णालय आहे, याची माहिती मिळते.

ही जनजागृती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या गावात, नातेवाईकांच्या ग्रुपवर पोहोचवावी, असे आवाहनही श्री. मसुरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा