पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार; सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात हा करार पार पडला. यावेळी पालकमंत्री राणे यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शासकीय इमारती ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने या प्रकल्पासाठी विशेष आग्रही भूमिका घेतली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रेरणा दिली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, ‘महाप्रित’चे मुख्य अभियंता श्री. वहाणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
करारानुसार जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा योजना इमारती आणि इतर शासकीय इमारतींवर सोलार पॅनेल बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच हरित ऊर्जेचा वापरही वाढणार आहे.
प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात ‘महाप्रित’कडून सर्व संबंधित इमारतींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष सोलार यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम शासकीय यंत्रणेला आधुनिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
