कुडाळात १० मे रोजी ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’
वृक्षदिंडीपासून संमेलनाची सुरुवात; मान्यवरांची उपस्थिती, पर्यावरण-जागरूकतेसाठी व्यापक आवाहन
कुडाळ | प्रतिनिधी :
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ यंदा कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रविवार, दि. १० मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘जय वासुदेवानंद हॉल’ (आर.एस.एन. हॉटेल शेजारी, उद्यम नगर) येथे हे भव्य संमेलन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी १० मे १९९७ रोजी ‘सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा’ म्हणून केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्याच्या समृद्ध निसर्गसंपदेचा जागर करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मा. सौ. निलम नारायण राणे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुयोग धस (आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित) असतील.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते जयराजजी नायर, ॲड. मनोज आखरे (राष्ट्रीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) आणि अभिमन्यू पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मंत्री नितेश राणे, गणेश नाईक, पंकजा ताई मुंडे, आमदार दिपक केसरकर, निलेश राणे, वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस्ये, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशी भव्य ‘वृक्षदिंडी’ काढून होईल. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता दीपप्रज्वलन व उद्घाटन सोहळा, १०:२० वाजता शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. पुढे पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
दुपारच्या सत्रात विशेष अतिथींची भाषणे, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमींचा गौरव सोहळा (पुरस्कार वितरण) पार पडणार आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरणप्रेमी, प्राणी मित्र, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, पर्यावरणाबाबत जनजागृती आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींनी या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
