कुडाळात इंधन टंचाई; वाहनधारकांची पंपावरून पंपावर धावपळ
पेट्रोल-डिझेल संपल्याने नागरिकांची गैरसोय; तातडीने पुरवठा वाढवण्याची मागणी
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळमधील बहुतांश पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने आज सोमवारी सकाळपासून अनेक ठिकाणी ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ अशा सूचना फलक लावण्यात आले आहेत. या अचानक निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांना एका पेट्रोलपंपावरून दुसऱ्या पंपावर अशी धावपळ करावी लागत असून शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना आवश्यक कामे प्रलंबित ठेवावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या परिस्थितीमुळे दैनंदिन वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असून खासगी तसेच व्यावसायिक वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने तातडीने पुरेशा प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
