You are currently viewing बहावा….. एक देखणा वृक्ष

बहावा….. एक देखणा वृक्ष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*बहावा….. एक देखणा वृक्ष*

 

चैत्राचे कौतुक म्हणजे माहेरी आलेली अन्नपूर्णा, तिची आरास, हळदीकूंकू, आंबा मोहरतो… हिरव्या कैरीचे घोस, मग पिकलेले पिवळसर आंबे फणस जांब जांभळे रातांबे टरबूज कलिंगडे ह्या सर्वांबरोबर चैत्रपालवी, फूलांच्या बहराची रंगपंचमी .. ह्या सगळ्यांचा मनसोक्त आनंद, ऊपभोग. त्यात गुढी पाडवा… रामनवमी.. हनुमान जयंती हे सण.

या सर्वात चैत्र झट्कन सरतो

मग ग्रिष्म येतो अक्षयतृतिया घेऊनच.

वैषाखाचा वणवा चालू होतो. ऊन्हाचा तडाखा सोसेनासा होतो. अक्षयतृतिया हा शुभमुहूर्ताचा सण असतो. पुरण तळण इ. चा नैवेद्य असतो. चैत्रगौर आज परत माघारी फिरते. कैरीचे पन्ह, डाळ, काकडी टलबूज कलिंगड देऊन निरोप द्यायचा असतो.

या वैशाख वणव्यात एक अत्यंत सुंदर दृष्य दिसू लागते. पूर्वी राना वनातच दिसे. परंतु हल्ली मात्र शहरात गांवोगांवी हे वृक्ष मुद्दामच गल्लोगल्ली लावले गेलेत. वर्षभर हे शांत गुणी मुलासारखे ऊभे असतात. कोणी वाटसरू दखलही घेत नाही. हिरव्या पानांनी भरलेला असतो. काही आवाज, कौतुक नाही. फारशी पक्षांची घरटीही दिसत नाहीत. खुप सावली नसते. वाराच थंडावा देईल तितकंच. बाकी निमुटपणे ऊभा असतो.

चैत्र सरताच ह्या वृक्षावर हिरव्यागार पानांआड पिवळ्या कळ्यांचे लोलक, झुंबरे लोंबायला लागतात. पिवळा हळदीचा रंग घेऊन हा वृक्ष कळ्यांच्या झुंबरांनी बहरून येतो. ग्रिष्माच्या येण्याची वर्दी घेऊन येतो.पाच सहा दिवसात ह्या कळ्या पाठोपाठ बहरू लागतात. पाने त्या आड दडतात.

पूर्ण वृक्ष या फुललेल्या पिवळ्या झुंबरांनी बहरून जातो. फुललेली ही झुंबरे वार्याबरोबर झुलत खेळू लागतात.आणि असे अनेक बहावा वृक्ष बहरून येत अत्यंत नैसर्गिक पण नयनरम्य मोहक, लोभस दृष्य दिसूं लागतं.

वैषाख वणवा विसरला जातो. बहुदा धरतीचा हा ऊष्म्याचा तडाखा सुसह्य करायलाच हे वृक्ष फुलून येतात.

जागोजागी अनेक ठिकाणी हे हळदुले बहावे सौंदर्य सांडत असतात.

त्या पिवळ्या झुंबरांवर छोटी फुलपांखरे नाचू लागतात.

काही छोटे पक्षी मिळेल त्या सावलीत येऊन स्थिरावतात. एरवी घरटे बांधावे अशी पाने, फांद्या नसतात आणि ऊन्हाळ्यात या लोंबत्या झुंबरात सावली मिळत नाही. मग घरटे कसे बांधणार.

तरूतळी शिळ्या फुलांच्या पाकळ्या गळून सांचतात व पिवळा गालिचा पसरतो.

इतक्या वैषाख वणव्यात किती ही आसुसून फुलायची आसक्ती! स्वत: तडाखा सोसत इतरांना सौंदर्य वाटत फुलायचे!

ऊन्हाचा तडाख्यात वारा ही शांत स्तब्ध असतो. जणू अग्नीतुनच हा फुलून येतो.

रूबाबदार, देखणा, पिवळ्या मुंडावळ्या बांधुन हा हळदुल्या एखाद्या हळद लागलेल्या नवरदेवासारखा दिसतो. अग्नीज्वालेतुनही शीतलता फुलवतो.

कवयत्री मा. इंदिरा संत यांनी याचे अनेक वर्षापूर्वी सुंदर असे वर्णन करून ठेवले आहे.

त्या म्हणतात, त्या पिवळ्या लोलकांना हिरवी पाने पाचूच्याच कोंदणात बसवतात. कधी हळद लावलेला रूबाबदार नवरदेव तर कधी कटीवर पिवळ्या लोलकांची मेखला लेऊन हळद लागलेली लाजरी, नववधूच आपले वस्त्र सावरत ऊभी आहे. तन सावरावे का मन?

पितांबर कटी नेसुन अवनीचा दाह कमी करायला हा श्रीकृष्ण तर बहाव्याचे रूप घेऊन आला नाही ना,? का पुन्हा पुन्हा तो युगंधर बहाव्याच्या रूपात अवतरतो?

इतक्या सुंदर कल्पना या बहावा बघुन सुचतात.

सृष्टीचे हे एक अद् भूत असे सौंदर्य आहे. ग्रिष्माच्या दाहकतेतही, फुलावे… आनंदाचे समर्पण करावे… शीतलता द्यावी.. दाहकता कमी करावी. असे रौद्र परिस्थितही बहावा जगायला शिकवतो.

पुन्हा पुन्हा पहावा,

डोळे भरून‌ पहावा,

काळजात जपावा,

असा हा देखणा वृक्ष बहावा.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा