मुदतवाढ द्यावी, ई-पीक पाहणी व फार्मर आयडी अट तात्पुरती रद्द करण्याची मागणी; देवगड तहसीलदारांना निवेदन
देवगड :
सध्या आंबा व काजू बागायतदारांवर आलेल्या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रियेत असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात तसेच अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या वतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकसानभरपाईसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असली तरी त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या काही अटी व तांत्रिक अडचणींमुळे अनेक बागायतदारांना अर्ज करता येत नाही. विशेषतः ई-पीक पाहणी, फार्मर आयडी आणि इतर कागदपत्रांच्या अटींमुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदार वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे अर्ज प्रक्रियेत असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, अर्जासाठी मुदतवाढ द्यावी आणि ज्या बागायतदारांची ई-पीक पाहणी नोंद झालेली नाही, त्यांच्यासाठी तलाठीमार्फत हस्ते (मॅन्युअल) नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व बागायतदारांचे फार्मर आयडी अद्याप तयार नसल्याने ही अट तात्पुरती शिथिल करून अर्ज स्वीकारावेत, अशीही मागणी करण्यात आली.
या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून सर्व पात्र बागायतदारांना नुकसानभरपाईचा लाभ मिळेल, यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद ढोके यांच्यासह प्रसाद मोंडकर, आप्पा अनभवणे, गणेश वाळके, प्रशांत शिंदे, नीलेश पेडणेकर, विकास दीक्षित आदी उपस्थित होते.
