महाराष्ट्राच्या प्रशासनात सर्वोच्च पदावर असलेल्या मुख्य सचिवांच्या हस्ते एखाद्या आयएएस अधिकाऱ्याचा सन्मान होणे सत्कार होणे ही फारच मानाची गोष्ट आहे. तो मान यावर्षी महाराष्ट्रातील संभाजीनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्या महाबीजचे महाव्यवस्थापक असलेले श्री दिलीप स्वामी यांना प्राप्त झाला आहे. लागोपाठ पुरस्कारास पात्र ठरलेले आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने अतिशय उत्कृष्ट कार्य करून आदर्श प्रस्थापित केल्याबद्दल श्री दिलीप स्वामी यांना हा पुरस्कार प्रदान करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांनी लिहिलेल्या या पत्रात आपले हे कार्य महाराष्ट्रातील इतर सर्व पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे म्हणून आपला हा सत्कार करण्यात येणार आहे असे त्यांनी लिहिले आहे. श्री दिलीप स्वामी यांचा हा सत्कार समारंभ येत्या मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता मलबार हिलवरील सुप्रसिद्ध अशा शासकीय सह्याद्री अतिथिगृहात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणजे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल यांच्या हस्ते श्री दिलीप स्वामी यांचा हा सत्कार होणार आहे .
यापूर्वी देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेला श्री दिलीप स्वामी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी महसूल विभागामध्ये जी अभिनव कार्यपद्धती अवलंबली त्याबद्दल त्यांना पुरस्कृत करून त्यांचे अभिनंदन केले असून ही कार्यपद्धती संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या जिल्ह्यांमध्ये राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संभाजीनगर येथे येण्यापूर्वी श्री दिलीप स्वामीसाहेब सोलापूरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसाठी तसेच सोलापूर जिल्हा परिषदेतील शाळांसाठी जो अभिनव उपक्रम राबविला तो देखील असा स्तुत्य होता. या अभिनव उपक्रमाची दखल घेऊन आपल्या महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी देखील त्यांना पुरस्कृत करून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात योग्य आहे असे विधान करून श्री दिलीप स्वामी यांच्या कार्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे.
साहेब विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य केले. आपला यवतमाळ जिल्हा हा संपूर्ण भारतामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे पुसून टाकण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक व माजी मुख्यमंत्री श्री सुधाकरराव नाईक यांचे गाव. या तालुक्याच्या गावी राहून त्यांनी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले. शेतकऱ्यांमध्ये ते मिसळले. यांचे सुखदुःख जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या घरापर्यंत ते गेले. त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. त्याचा असा परिणाम झाला की पुसद तालुक्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले. त्यांच्या या कार्याची दखल प्रसार माध्यमांनी घेऊन त्यांना खरेखुरे आयडॉल संबोधून त्यांचा खरेखुरे आयडॉल या बहु चर्चित ग्रंथात समावेश केला आहे.
श्री दिलीप स्वामी यांचा माझा परिचय खूप जुना आहे. त्याला आता तीस वर्षाचा कालावधी होईल. योगायोगाने त्यांचे पहिली पोस्टिंग उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथेच झाले. त्यांचे मित्र श्री अविनाश हदगल व श्री संजय सरवदे हे देखील अमरावतीला उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यांना अमरावतीच्या कॅम्प विभागातील कांता नगर या शासकीय वसाहतीत राहण्यास बंगला मिळाला. योगायोगाने माझा बंगला महापौरांच्या बंगल्यासमोर आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शासकीय वसाहत. साहेबांच्या चांगल्या स्वभावामुळे व माझ्या मिशन आय ए एस च्या कार्यामुळे ऋणानुबंध जुळून यायला वेळ लागला नाही.
आपल्या प्रशिक्षण काळात श्री दिलीप स्वामी आमच्या विविध उपक्रमात सहभागी झाले. विशेष म्हणजे 10 ऑगस्ट 2002 रोजी आम्ही डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या अंतर्गत मिशन आयएएस अभ्यासिका व ग्रंथालय सुरू केले. त्याचे उद्घाटन श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते झाले . तेव्हा ते अमरावतीला उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.आज या गोष्टीला 24 वर्षे पूर्ण होत आहेत.
श्री दिलीप स्वामी यांची बदली वेगवेगळ्या ठिकाणी होत गेली. परंतु ते कायम संपर्कात होते आणि आजही आहेत. मला आठवते स्वामी साहेबांना एवढे पुरस्कार एवढा त्यांचा गौरव होण्यामागे त्यांची कर्तव्यनिष्ठता तत्परता कारणीभूत आहे. ते यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे.
साहेब अमरावतीला उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तो जूनचा महिना होता. मुलांना उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले रहिवासी प्रमाणपत्र याच महिन्यात पाहिजे असतात. साहेबांकडे प्रचंड अर्ज यायला लागले. तेव्हा आजच्यासारखी संगणक व्यवस्था उपलब्ध नव्हती. बऱ्याच चा कार्यभार टंकलेखन व हस्ताक्षरातच चालायचा. साहेब दिवस-रात्र काम करू लागले. आपण एखाद्याला सोबत घेऊन हे काम करावे असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना विनंती केली की सर माझ्याकडे कामाचा व्याप खूप वाढला आहे. मी रात्रंदिवस काम करीत आहे तरी मला आपण जर एक सहकारी दिला तर हे काम लवकर होईल.
स्वामी साहेबांचा स्वभाव रोजचे काम रोज करणे हा होता आणि आजही आहे त्यांना कोणतेही काम सांगा ते नियमात बसत असेल तर ते त्याच दिवशी करतात. त्यांच्या मदतीला जे सहकारी आले त्यांच्या फायली पेंडिंग राहू लागल्या. साहेबांना हे कळले. साहेब आपले काम तर करीत होते पण सहकारी मित्रामुळे लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. अनेक लोकांना बाहेरगावी प्रवेश घ्यायचे असतात .त्यासाठी त्यांना दाखले तात्काळ पाहिजे असतात .शेवटी साहेबांनी ठरविले .मी रात्रीचा दिवस करेल पण मुलांना त्याच दिवशी प्रमाणपत्र मिळेल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेल आणि त्यांनी तसे करून दाखविले .त्यासाठी प्रसंगी त्यांना भरपूर जागरण करावे लागले. परिवाराकडे दुर्लक्ष करावे लागले पण
जितनेवाले कोई अलग काम नही करते
वे हर काम अलग ढंग से करते है
या न्यायाने त्यांनी काम केले व आजही करीत आहेत.
अमरावतीच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये साहेबांनी स्वतःला झोकून दिले आहे. साहेबांच्या बदल्या होत गेल्या .पण त्यांची अमरावतीची नाळ आजही कायम आहे. अमरावती फेस्टिवल ही साहेबांच्या काळात सुरू झालेली योजना. ती आजही कायम आहे. साहेब कुठेही असले तरी दरवर्षी न चुकता अमरावती फेस्टिवलला उपस्थिती लावतात .हा माझाच कार्यक्रम आहे .या नात्याने ते रसिकांमध्ये बसतात. मी मोठा आय ए एस.अधिकारी आहे या या नात्याने ते कधीच वागत नाहीत.त्यामुळे सर्वांना ते आपलेसे वाटतात.
सदैव आपल्या कामात तत्पर राहिल्यामुळे त्यांना लागोपाठ महाराष्ट्र शासनाने तसेच माननीय मुख्यमंत्र्यांनी पुरस्कृत केले आहे.
ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. साहेब जेव्हा अमरावतीला येतात तेव्हा त्यांचे आणि आमचे जिवलग मित्र सहायक आयुक्त श्री ओम प्रकाश चर्जन यांच्यामार्फत आम्हाला त्यांचा फोन येतो. मी अमरावतीला येत आहे .तुम्ही अमरावतीलाच थांबा .आपण भेटू या .सोबत जेवण घेऊ या. चर्चा करू या. त्यांचा फोन आला म्हणजे आम्हाला खूप धन्य वाटते.
परवा संभाजीनगरला मी गेलो. महात्मा गांधी विद्यापीठात एका कार्यक्रमाला गेलो होतो. बरोबर माझे सत्यशोधक मित्र श्री के.ई. हरिदास हे होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मी साहेबांना भेटावयास जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. साहेबांची भेट झाली .मी साहेबांना आमच्या ग्रीष्मकालीन शिबिराचे निमंत्रण दिले. साहेबांनी ते स्वीकारले. 16 ते 22 मे च्या दरम्यान आम्ही अमरावतीच्या भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे .त्याचे उद्घाटन साहेबांचे हस्ते होत आहे. एक कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर आदर्श व्यक्तिमत्व असलेले आयएएस अधिकारी नव्याने आयएएस इच्छिणाऱ्या तरुण युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या निमित्ताने येणार आहेत.
मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुंबईला साहेबांचा होणारा हा सन्मान खरोखरच माननीय आयुक्तांनी लिहिल्या प्रमाणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रेरणा देणारा असाच आहे .कारण साहेबांनी 90% काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण केले आहे. एखादी योजना ठरलेल्या कालावधीमध्ये 90% पूर्ण करणे म्हणजे कठीणच काम असते. या कामात त्यांच्या अधिकारी मित्रांची व कर्मचारी मित्रांची देखील त्यांना सुसंगत लाभली आहे हे वेगळे सांगणे न लगेच. त्यामुळे ते हे यश यश गाठू शकले. याची त्यांना देखील जाणीव आहे आणि ती त्यांनी व्यक्तही केली आहे.
साहेबांच्या या यशात सौ वहिनी साहेबांचा मोलाचा वाटा आहे हे वेगळे सांगणे न लगे. समर्थ साथ मिळाली म्हणजे आणि समविचारी साथ मिळाली म्हणजे रथाची दोन्हीही चाके सुरळीत प्रगतीकडे वाटचाल करतात .तसे साहेबांचे आणि वहिनीसाहेबांचे जुळलेले समीकरण आहे आणि याचमुळे ते पुढे पुढे जात आहेत .त्यांनी असेच पुढे पुढे जावे हे मनापासून वाटते आणि वाटत राहणार आहे. त्यांना प्राप्त होणाऱ्या सत्काराबद्दल सन्मानाबद्दल मनापासून अभिनंदन व शुभेच्छा..!
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी
अमरावती कॅम्प
9890967003
