You are currently viewing हमाल पंचायत पुणे निवडणूक: गोरख मेंगडे अध्यक्ष, अंकुश अवताडे सरचिटणीसपदी दणदणीत विजय

हमाल पंचायत पुणे निवडणूक: गोरख मेंगडे अध्यक्ष, अंकुश अवताडे सरचिटणीसपदी दणदणीत विजय

हमाल पंचायत पुणे निवडणूक: गोरख मेंगडे अध्यक्ष, अंकुश अवताडे सरचिटणीसपदी दणदणीत विजय

डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांवर आधारित पॅनलचा एकतर्फी विजय; प्रतिस्पर्धी पॅनलचा पूर्ण पराभव

पुणे

मार्केट यार्ड येथील हमाल भवनमध्ये पार पडलेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ. बाबा आढाव यांच्या विचारांनी प्रेरित “निष्ठावान पॅनल”ने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत गोरख मेंगडे यांची अध्यक्षपदी तर अंकुश पंढरीनाथ अवताडे यांची सरचिटणीसपदी भरघोस मतांनी निवड झाली.
या निवडणुकीत निष्ठावान पॅनलने प्रतिस्पर्धी “एकनिष्ठ पॅनल”चा पूर्ण पराभव करत एकतर्फी विजय संपादन केला. या विजयामागे सभासदांमध्ये डॉ. बाबा आढाव यांच्याबद्दल असलेली सहानुभूती आणि त्यांनी वंचित घटकांसाठी केलेले कार्य हे प्रमुख कारण असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी सांगितले.
सरचिटणीसपदी निवडून आलेले अंकुश अवताडे यांनी हा विजय वैयक्तिक नसून डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचा आणि विचारांचा विजय असल्याचे नमूद केले. “माझ्या प्रतिस्पर्ध्याला २०० मते मिळाली, तर मला १४०० मते मिळाली. हा घवघवीत विजय सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी राज्यभर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
उपाध्यक्षपदी सोपान धायगुडे यांची निवड झाली असून त्यांनीही सर्व सभासदांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले. “संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार विजयी झाले असून त्यामध्ये अध्यक्ष गोरख मेंगडे, सरचिटणीस अंकुश अवताडे, उपाध्यक्ष सोपान धायगुडे, गर्जे मुरलीधर, डोंबाळे दत्तात्रय, धायगुडे संदीप, मारणे संदीप, खजिनदार मानकर चंद्रकांत, सहसरचिटणीस फुंदे मंगेश, शिंदे विनोद, डोलारे अरुण आणि वत्सला गवळी यांचा समावेश आहे.
नानापेठ आणि पुणे परिसरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा