वादळग्रस्त सावंतवाडीची केसरकरांकडून पाहणी; २१ ठिकाणी नुकसान
पंचनाम्याचे आदेश, विशेष मदतीचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या नुकसानीकडेही सरकारचे लक्ष वेधणार
सावंतवाडी
गुरुवारी रात्री वादळी वारा आणि पावसाने सावंतवाडी शहरात थैमान घातल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी आज शुक्रवारी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली. सबनीसवाडा, मोती तलाव, रामेश्वर प्लाझा तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय परिसराला भेट देत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून, संबंधित ठिकाणांचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. तसेच चक्रीवादळाच्या निकषांखाली नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, “नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी तहसीलदारांसोबत बैठक आयोजित केली आहे. तसेच महावितरणचा खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.” याशिवाय सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तळकोकणातील शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्रश्नही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांनीही शहरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. “नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमची टीम सज्ज आहे. नगरसेवकांकडून नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे. महावितरणसोबत बैठक घेऊन पावसापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्याबाबतही लक्ष वेधणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य मिळत असून, पालकमंत्री नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष या परिस्थितीकडे वेधले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणीदरम्यान मुख्याधिकारी विनायक औंधकर, युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, वैभवकुमार अंधारे, दीपक म्हापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.
