*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*
*वैशाखी वणवा*
बकुळ, मोगरा,प्राजक्ताची शेज सुगंधी सजवा
अंगांगाला किती जाळतो हा वैशाखी वणवा
लाही होते देहाची अन
निज जराही येई ना
घामेजले अंग केव्हढे
शांत कशाने होई ना
जुई फुलांचा नाजुक मंचक सख्या तुम्ही हो घडवा
अंगांगाला किती जाळतो हा वैशाखी वणवा
उंबरठ्यावर दिवा ठेवला
खुली घराची दारे
अर्ध्या राती वाहू लागले
मत्त सुगंधी वारे
फुलून आला चाफा त्यांचा ऊत जरासा अडवा
अंगांगाला किती जाळतो हा वैशाखी वणवा
गुलमोहराने सजली रात
हातात कोणी धरली नाही
संपतं आला बहर तरीही
ओढ मनाची सरली नाही
त्या प्रेमाच्या सरीत आता आग जराशी विझवा
अंगांगाला किती जाळतो हा वैशाखी वणवा
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
22.04.2026
