प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप; माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
सावंतवाडी :
शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व नळपाणी योजनेच्या कामामुळे अनेक भागांतील जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्या असून नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी चार-चार दिवस पाणी येत नसून काही भागात गढूळ व जंतूयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. “नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. केवळ पाण्याची वेळ बदलून समस्या सुटणार नाही. सध्याची परिस्थिती गंभीर असून पावसाळ्यातही तीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “चार दिवसांच्या आत नळपाणी पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास नागरिकांसह घागर घेऊन नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.”
दरम्यान, ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हावे, अशी मागणी शिवसेनेने यापूर्वी सभागृहात केली होती. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली गेलेली नाही.
यावेळी नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, “महिलांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता घागर मोर्चा काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.
