You are currently viewing मालवणात पावसाळापूर्व तयारीला वेग : गटारसफाईसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण मैदानात

मालवणात पावसाळापूर्व तयारीला वेग : गटारसफाईसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण मैदानात

मालवणात पावसाळापूर्व तयारीला वेग : गटारसफाईसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण मैदानात

रस्ते जलमय होण्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी मायक्रो-प्लॅनिंग; कामात हलगर्जी सहन केली जाणार नाही

मालवण

मालवण शहरात दरवर्षी पावसाळ्यात गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली जाण्याचे चित्र यंदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता येताच पावसाळापूर्व कामांना वेग आला आहे.
शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरून साफसफाईच्या कामाची धुरा सांभाळली आहे. त्यांनी मुख्य गटारे आणि मोठ्या व्हाळ्यांच्या स्वच्छतेवर जातीने लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या काही वर्षांत नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नव्या सत्ताधारी गटाने या त्रुटी गांभीर्याने घेत पावसाळ्यापूर्वीच मायक्रो-प्लॅनिंग सुरू केले आहे.
शहरातील सर्व लहान-मोठ्या गटारांमधील साचलेली माती व कचरा पूर्णपणे काढण्याच्या सक्त सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. “पावसाच्या पाण्याला कुठेही अडथळा निर्माण होऊ नये, ही आमची प्राथमिकता आहे. कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा सभापती पूनम चव्हाण यांनी दिला आहे.
मान्सूनपूर्व मुख्य जलवाहिन्यांची सफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी पालिका प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या या सक्रियतेमुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जाण्याच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून मालवणकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा