गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी.
चिपळूण,मांडकी-पालवण,दिनांक:१७ एप्रिल २०२६,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण च्या दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदके पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी सुभाष थोरात हिने बीएससी (कृषी) अभ्यासक्रमात डॉ. बी.एस.के.के.व्ही. दापोली अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केले. या तिच्या अजोड कामगिरीबद्दल तिला मानाचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तिने संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या जिद्दीचे दर्शन घडवले आहे. त्याचप्रमाणे, २०१८-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनी कु. समीक्षा सुरेश बोने हिने देखील कृषी जैवतंत्रज्ञान या पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्कृष्ट यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे.
या यशामागे संस्थेचे संस्थापक कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, डॉ. शमिका चोरगे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांचे या विद्यार्थिनींना सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. “ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी जेव्हा विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक मिळवतात, तेव्हा संस्थेच्या शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब होते. साक्षी आणि समीक्षा या दोघींचाही महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे.” या यशाबद्दल दोन्ही सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुवर्णपदक पुरस्कार प्रदान करताना श्री. सुरेश प्रभू (माजी केंद्रीय मंत्री,भारत सरकार). पुरस्कार स्वीकारताना कु. साक्षी थोरात, डॉ. संजय भावे. (कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली.)
