*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आशा — एक सुरेल वादळ*
मनाच्या अथांग सागरात
हलकेच उठते एक लहर
कधी मंद झुळूक,
तर कधी सुरेल वादळ
बनून दरवळते अंतरभर
ती येते न बोलावता
आणि स्पर्शून जाते नकळत
तुटलेल्या स्वप्नांच्या काचांवर
रचते इंद्रधनुष्य अलगद
कधी डोळ्यांतल्या पाण्यातून
चमकते ताऱ्यासारखी
तर कधी अंधाऱ्या रात्रीत
होते पहाटेची चाहूल नवी
वादळ असते ती
पण विध्वंसाचे नव्हे
तर नव्या उभारणीचे
मनाच्या कोपऱ्यात लपलेल्या
धैर्याच्या जागृतीचे
आशा म्हणजे एक सूर
जो कधीच संपत नाही
वादळातही गात राहतो
थांबू नकोस
अजून वाट बाकी आहे असे सांगतो
आणि मग
आपण पुन्हा उभे राहतो
तुटलेल्या पंखांनीही उडतो
कारण त्या सुरेल वादळात
आपण स्वतःलाच नव्याने सापडतो…
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
