*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय माती मायबोली..*
माय माती मायबोली जीवनाचे मुलाधार
माय सांभाळी पिलांना आभाळी ती होई घार
काय वर्णावे मातीला तिच्या सारखी हो तिच
घेते पोटात साऱ्यांना सद् गुणी वा असो नीच..
नाही भेदभाव तेथे तिला सारखेच सारे
देते अपार इतके संपतच नाही ना रे
माय घेते पदरात चंद्रसूर्य घडविते
काही लकाकती जगी काही करतात माती..
देणे सारखेच आहे माय आणि या मातीचे
देणे द्यावे तिला नित्य पहा आपल्या प्रीतिचे
मायबोली मातृभाषा किती गोड किती गोड
तिच्या सारखी हो तिच जगी नाही तिला तोड..
गुण मातीचे घेऊ या किती रोंदा किती चेंदा
किती आहे क्षमाशील माफ करतेच सदा
खडकावरही येते रोप झळाळते किती
वारावादळपाऊस नाही कशाचीही भिती…
खडकही धरतो हो मुळे जाती खोलखोल
आणि शोधतात पहा जल जगण्या अनमोल
मातीसम मायबाप वादळात राखतात
दोष कितीही असू दे पदरात झाकतात..
माय माती मायबोली जगण्याचे सुत्रधार
नको होऊस माणसा कृतघ्न नि तिला भार
स्मरू उपकार यांचे माती कपाळी लावावी
माय आणि मायबोली कीर्त जगात राखावी…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
