सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक आणि सेवनाला आळा घालण्यासाठी सांगली जिल्ह्यातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा. संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी एनकॉर्ड समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा सदस्य सचिव रावसाहेब समुद्रे, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीसाठी पोलीस, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, उद्योग, उत्पादन शुल्क आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती आणि व्यापक जनजागृती यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावी करावी. तसेच, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित जनजागृती कार्यक्रम करावेत, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांची साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कारखाने व गोदामांची वेळोवेळी तपासणी करावी, अशा फेरसूचना देऊन तपासणीदरम्यान संशयास्पद बाबी आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना देऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
राज्य शासनाच्या ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ अभियानात सर्व शासकीय यंत्रणांच्या संपूर्ण समन्वयातून अंमली पदार्थमुक्त जिल्हा घडविण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. गृह विभागाने निश्चित केलेल्या कामगिरी मूल्यांकन आराखड्यानुसार १ नोव्हेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत जिल्ह्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी सहा प्रमुख घटकांअंतर्गत ४० निकष निश्चित करण्यात आले असून, एकूण ६५० गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आपला कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी दिले.
‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्ह्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना एनकॉर्ड समितीच्या बैठका, अंमली पदार्थांविरोधातील प्रभावी अंमलबजावणी, अंमली पदार्थांच्या पुरवठ्यात घट, सेवनाविरोधातील जनजागृती, व्यसनमुक्ती व पुनर्वसन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या सहा घटकांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
