२२ वर्षीय अँथोनीचा गळफास घेऊन आत्महत्येचा धक्कादायक प्रकार
९ दिवसांत सात आत्महत्या; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून लवकरच काउन्सलिंग उपक्रम
सावंतवाडी :
तालुक्यात आत्महत्यांची मालिका सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले असून केवळ ९ दिवसांत सात आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा अत्यंत गंभीर विषय लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे लवकरच काउन्सलिंग उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर ‘सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी’ येथील २२ वर्षीय अँथोनी डिसोजा या युवकाने राहत्या घरासमोर आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अँथोनी हा रात्री मित्रांसोबत आनंदात वेळ घालवत होता. मात्र काही तासांतच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर त्याला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी सहकार्य केले असून, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती आणि समुपदेशनाची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.
