You are currently viewing वैभववाडीत ‘सिंधू नायक केसरी’ कुस्ती स्पर्धेचे जंगी आयोजन

वैभववाडीत ‘सिंधू नायक केसरी’ कुस्ती स्पर्धेचे जंगी आयोजन

वैभववाडीत ‘सिंधू नायक केसरी’ कुस्ती स्पर्धेचे जंगी आयोजन; ११ एप्रिलला रंगणार थरार

खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; देशभरातील नामवंत ७० पैलवानांचा सहभाग

वैभववाडी
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वैभववाडीच्या वतीने ‘सिंधू नायक केसरी’ या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदान, वैभववाडी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिली.
वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, प्रकाश पाटील, आदित्य चव्हाण, संतोष पवार, शिवाजी राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भालचंद्र साठे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे उपमहाराष्ट्र केसरी तथा भारत केसरी पैलवान प्रकाश बनकर आणि ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान अमित कुमार (दिल्ली) यांची उपस्थिती असणार आहे.
या कुस्तीसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून इतर कुस्त्यांसाठीही आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेत पुरुषांच्या सुमारे ३५ तर महिलांच्या ५ कुस्त्या होणार असून प्रत्येक कुस्तीसाठी स्वतंत्र प्रायोजक ठेवण्यात आले आहेत.
कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यांमधून सुमारे ७० नामवंत पैलवान सहभागी होणार असून १० महिला पैलवानही या स्पर्धेत उतरणार आहेत. तसेच विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागाची संधी देण्यात आली आहे.
या जंगी कुस्ती स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भालचंद्र साठे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा