You are currently viewing “चला कुडाळ घडवूया…!” पर्व तिसरे

“चला कुडाळ घडवूया…!” पर्व तिसरे

“चला कुडाळ घडवूया…!” पर्व तिसरे : विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्र मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम

२५ एप्रिल रोजी कुडाळात विनाशुल्क उपक्रम; नोंदणी अनिवार्य – नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहिती

कुडाळ :

“चला कुडाळ घडवूया…!” या उपक्रमाच्या पर्व तिसऱ्या अंतर्गत कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन तसेच आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत कुडाळ येथील बॅ. नाथ पै विद्यालय (कुडाळेश्वरवाडी) प्रांगणात होणार असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरसेवक शिरसाट यांच्या पुढाकारातून “चला घडवूया कुडाळ” हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाला यापूर्वीही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. पहिल्या पर्वात आयएएस अधिकारी दत्तप्रसाद शिरसाट यांच्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमास सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते, तर दुसऱ्या पर्वात सेवानिवृत्त उपायुक्त गणेश दळवी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाला अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच व्यापाऱ्यांसाठी जीएसटी प्रणालीवरील मार्गदर्शन कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
पर्व तिसऱ्यात विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची ओळख करून देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात स्लाईड शोसह व्याख्यानाद्वारे विश्वाची ओळख, आकाशगंगा, तारे, सूर्यमाला तसेच भारत आणि जगातील खगोलशास्त्रीय संशोधन याविषयी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यासोबतच खगोलशास्त्रातील करिअरच्या संधींबाबतही माहिती दिली जाईल.
यानंतर ग्रीन लेझरच्या सहाय्याने रात्रीच्या आकाशातील राशी, नक्षत्रे, तारे व ग्रह यांची ओळख करून देण्यात येणार असून, ८ इंच व ६ इंच व्यासाच्या टेलिस्कोपद्वारे चंद्र, गुरू, शुक्र, क्लस्टर आणि नेब्युला यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवले जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम कुडाळ शहर मर्यादित असून पूर्णपणे विनाशुल्क आहे. मात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. पुणे येथील खगोलशास्त्र क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केले आहे.
यावेळी संतोष वारखंडकर, संदीप महाडेश्वर, अमित राणे, हर्षद पाटील व विनय पालकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा