निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी कार्यक्रम
देवगड :
देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद नितीन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शाल घालून स्वागत केले.
या वेळी माजी आमदार अजित गोगटे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जामसंडे-देवगड परिसरातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशात समावेश होता. यामध्ये राजेंद्र शिरोडकर, घननीळ कणेरकर, प्रदीप पडेलकर, भालचंद्र पारकर, गणपत जाधव, प्रवीण जाधव, ओंकार लाड, गणपत लाड, सुरज भिडे, दिनेश परब, जनार्दन कोयंडे तसेच बबन केवळ यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे देवगड तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असल्याचे मानले जात असून, उबाठा पक्ष मात्र आणखी कमकुवत झाल्याची चर्चा आहे.
यावेळी बोलताना निनाद देशपांडे यांनी सांगितले की, “पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व त्यांच्या रूपाने मिळाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेसाठी सक्रिय काम करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
