देव कलेश्वर मंदिरात अविस्मरणीय ‘स्वर संध्या’ रंगली; शास्त्रीय, भावगीत आणि अभंगांनी उंचावला आध्यात्मिक रंग
कुडाळ :
सुरेल तानांची बरसात, वाद्यांची लाभलेली समर्थ साथ आणि रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… अशा अत्यंत चैतन्यमय वातावरणात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक महेश काळे यांच्या ‘स्वर संध्या’ या संगीत मैफलीने कुडाळ-नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर परिसर अक्षरशः स्वरमय रंगला. वसंत पूजेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला सिंधुदुर्गसह रत्नागिरी, कोल्हापूर आणि गोवा राज्यातून हजारो रसिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाला चार चाँद लावले.
अमेरिका ते पुणे आणि पुढे सिंधुदुर्ग असा तब्बल अठ्ठावीस तासांचा प्रदीर्घ प्रवास करून आलेल्या महेश काळे यांनी गुरुवारी माणगाव येथील दत्त मंदिरात प्रथम दर्शन घेतले. मंदिरातील शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरणाने प्रवासाचा सर्व थकवा दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने रामनामाचा जप करावा तसेच भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य सर्वांनीच करावे, असे आवाहनही केले.
मैफलीची सुरुवात ‘शिवरंजनी’ रागातील ‘महादेव’ या बंदिशीने झाली. या सुरेल आरंभीनेच वातावरणात भक्तीभावाची लहर निर्माण झाली. त्यानंतर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाजलेले ‘सुर निरागस हो’ हे भावगीत सादर करत त्यांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त करून दिली. पुढे ‘दिगंबरा दिगंबरा’ या जयघोषात ‘दत्त नामाचा करुनी गजर, हरुनी घ्या हो माझे चित्त’ या अभंगावर आधारित सादरीकरणाने उपस्थित रसिकांना भक्तिरसात रंगवले.
यानंतर ‘शब्दवाचून कळले सारे’ या भावगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गाण्यातील भावार्थ आणि सादरीकरणातील नजाकत यामुळे प्रत्येक रसिक त्या सुरांमध्ये हरवून गेला. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या गाण्यातून भावनांची खोली अधिक अधोरेखित करत महेश काळे यांनी आपल्या गायकीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अभंगांच्या सादरीकरणाने वारीची अनुभूती निर्माण झाली. संत तुकाराम महाराजांचा ‘आता कोठे धाव मन, तुझे चरण देखियेला’ हा अभंग सादर करत त्यांनी भक्तीभाव व्यक्त केला. त्यानंतर संत नामदेव महाराजांचा ‘सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी’ हा अभंग ‘यमन’ रागात सादर करत रसिकांना अध्यात्मिक उंचीवर नेले. ‘जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले’ या ओळींनी वातावरण भारावून गेले.
मैफलीच्या शेवटी संत चोखामेळा यांचा ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग ‘अडाणा’ राग आणि ‘द्रुत तीनताल’ मध्ये सादर करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अत्यंत वेगवान ताना आणि शास्त्रीय प्रभुत्वाने त्यांनी रसिकांना थक्क केले. कार्यक्रमाच्या अखेरीस नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण आणखी रंगले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रम काहीसा लवकर आटोपता घेतला असला तरी “पुन्हा सिंधुदुर्गात यायला आवडेल” असे सांगत महेश काळे यांनी सर्व रसिकांचे आणि आयोजकांचे आभार मानले.
