You are currently viewing कुडाळात गांजा विक्री करणारा तरुण रंगेहात अटकेत; पोलिसांची धडक कारवाई
Oplus_16908288

कुडाळात गांजा विक्री करणारा तरुण रंगेहात अटकेत; पोलिसांची धडक कारवाई

५३६ ग्रॅम गांजा जप्त; ३८,२७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मोहिमेला यश; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कुडाळ (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कुडाळ एमआयडीसी परिसरातील वरची कुंभारवाडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला कुडाळ पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. शुभम संदीप परब (रा. कुडाळेश्वरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

१ एप्रिल २०२६ रोजी पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुंभारवाडी येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचला व संशयित शुभम परब याला ताब्यात घेतले.

आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ५३६ ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत २६,८०० रुपये) आढळून आला. याशिवाय रोख रक्कम ३,८७० रुपये, डिजिटल वजन काटा, गांजा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, आधारकार्ड व मतदान ओळखपत्र असा एकूण ३८,२७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

जिल्ह्यात तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे. “कुणीही अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्या. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल,” असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, उपनिरीक्षक सचिन अवताडे, पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर, पोलीस कर्मचारी कृष्णा केसरकर, संजय कदम, सचिन गवस, समीर बांदेकर, रुपेश गवस आणि विष्णू रामदास यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा