खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या मुकुटाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते पूजन
मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा ७१ वा वर्धापन दिन तसेच मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेचा ४ था वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वतीने नव्या झळाळीसह तयार करण्यात आलेला सुवर्ण मुकुट मंगळवार, ३१ मार्च रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर अर्पण करण्यात आला.
पूर्वी मंदिरातील जुन्या मूर्तीला खासदार राणे यांनी सुवर्ण मुकुट अर्पण केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत मंदिरात नव्या स्वरूपातील भव्य श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आल्याने राणे यांच्या प्रेरणेतून अधिक मोठ्या आणि आकर्षक स्वरूपात नवीन सुवर्ण मुकुट तयार करण्यात आला.
१० एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा मुकुट अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिर अध्यक्ष वसंत गांवकर, मुंबई अध्यक्ष अरुण कासवकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अंकित नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, मोहन वराडकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, भाऊ चव्हाण, किसन मांजरेकर, शेखर गाड, अखिलेश शिंदे, सुशील शेडगे, गणेश परब, भाई कासवकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निमित्ताने श्रीकृष्ण मूर्तीची पूजा, अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
