You are currently viewing सोनुर्ली नवयुवक मंडळाचा सामाजिक बांधिलकीला हातभार; रुग्णवाहिकेसाठी १० हजारांची मदत

सोनुर्ली नवयुवक मंडळाचा सामाजिक बांधिलकीला हातभार; रुग्णवाहिकेसाठी १० हजारांची मदत

सोनुर्ली नवयुवक मंडळाचा सामाजिक बांधिलकीला हातभार; रुग्णवाहिकेसाठी १० हजारांची मदत

‘सोनुर्ली प्रीमियर लीग’च्या माध्यमातून उभारलेल्या निधीतून सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला सहकार्य

सावंतवाडी

सोनुर्ली – पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने आपल्या सामाजिक कार्याचा वारसा जपत सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी सुरू असलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन मंडळाने हा मदतीचा हात दिला आहे. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर यांनी ही रक्कम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्याकडे सुपूर्द केली.
​नवयुवक कला क्रीडा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू तसेच सेवाभावी संस्थांना सातत्याने अर्थबळ पुरवत आले आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘सोनुर्ली प्रीमियर लीग’ या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून संकलित झालेल्या लोकवर्गणीतून मंडळ हा स्तुत्य उपक्रम राबविते. सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सामाजिक कार्याचा वसा घेऊन शहरात आरोग्य आणि इतर सामाजिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. प्रतिष्ठानचे हे निस्वार्थी कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याने, यावर्षीची मदत त्यांच्या रुग्णवाहिका उपक्रमाला देण्याचा निर्णय मंडळाने घेत सदरची मदत प्रतिष्ठानला मंगळवारी देण्यात आली.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, रवी जाधव, शरदिनी बागवे यांच्यासह नवयुवक मंडळाचे अध्यक्ष संतोष ओठवणेकर,सदस्य नारायण नाईक, सत्यवान नाईक, रुपेश हिराप, भीमसेन मसुरकर, सुशील हिराप, सिद्धेश मसुरकर, गणपत अणावकर आदी मान्यवर उपस्थित होते. नवयुवक मंडळाने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल आणि मोलाच्या सहकार्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा