सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा; रिक्त वैद्यकीय पदे महिनाभरात भरण्याचे आदेश
आ. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
सावंतवाडी :
सावंतवाडी मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांबाबत आमदार दीपकभाई केसरकर यांच्या मागणीनुसार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईतील आरोग्य भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामातील कायदेशीर अडथळा दूर झाला असून, जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय पदे एका महिन्यात भरण्याचे ठोस निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत.
सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होऊन सात वर्षे झाली तरी जागेचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने बांधकाम रखडले होते. बैठकीस उपस्थित असलेले राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले आणि कुमार भोगले यांनी लोकहितासाठी रुग्णालयाचे बांधकाम त्वरित सुरू होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या कामासाठी आमची कोणतीही हरकत नसल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात नाहरकत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. त्यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी मंत्री आबिटकर यांनी प्रकल्पाचे नवीन अंदाजपत्रक सादर करण्याचे तसेच शेजारील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली करण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले. तसेच, तांत्रिक कारणामुळे बंद पडलेली गोवा मेडिकल कॉलेज आणि बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमधील ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
सिंधुदुर्ग हा देशातील पहिला स्वच्छ व पर्यटन जिल्हा असल्याने आरोग्य पर्यटनालाही चालना देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पंचकर्म सुविधा केंद्र’ तसेच ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ सुरू करण्याची मागणी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
