You are currently viewing जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जाहीर
Oplus_16908288

जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिलदरम्यान यलो अलर्ट जाहीर

गडगडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात ३० मार्च रोजी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून ३१ मार्च व १ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे सांगत प्रशासनाने पुढील सूचना दिल्या आहेत –

विजा चमकत असताना घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवावीत व स्त्रोतांपासून दूर करावीत. मोबाईल व दूरध्वनीचा वापर टाळावा. उंच झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. मोकळ्या जागेत असल्यास गुडघ्यात डोके घालून बसावे व धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

तसेच, विजेच्या पूर्वसूचनेसाठी मोबाईलवर ‘दामिनी अ‍ॅप’ डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (०२३६२-२२८८४७ / टोल फ्री १०७७), पोलीस हेल्पलाईन ११२ तसेच संबंधित तालुका नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी हवामानासंबंधी अधिकृत माहितीच विश्वासात घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये व आपली जीवित व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा