You are currently viewing सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा; अत्यावश्यक सेवा व मच्छीमारांना दिलासा

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा; अत्यावश्यक सेवा व मच्छीमारांना दिलासा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित निर्णय; रुग्णालये, बँका, शासकीय कामकाज सुरळीत राहणार

सिंधुदुर्गनगरी / (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवरील आदेशात महत्त्वाची सुधारणा केली आहे. या निर्णयामुळे रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका तसेच मच्छीमार आणि त्यांच्या संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा सुधारित आदेश जारी केला. यापूर्वी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरल यांसारख्या असुरक्षित साधनांमध्ये इंधन देण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, या निर्बंधांमुळे विशेषतः मच्छीमारांना अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने याची दखल घेत हा निर्णय घेतला आहे.

सुधारित आदेशानुसार, नोंदणीकृत मच्छीमार व त्यांच्या संस्थांच्या मासेमारी नौकांसाठी सुट्या पेट्रोल-डिझेल पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी आणि शासकीय कंत्राटदारांच्या अवजड यंत्रसामग्रीसाठीही हा अपवाद लागू करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन कामकाजातील अडथळे दूर होणार असून, शासकीय कामे, कंत्राटी प्रकल्प तसेच आरोग्यसेवा यामध्ये येणारा व्यत्यय टळणार आहे. दरम्यान, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी लागू असलेल्या इतर सर्व अटी व शर्ती मात्र पूर्ववत कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा