You are currently viewing अयोद्धेचा राजा

अयोद्धेचा राजा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*अयोद्धेचा राजा*

 

आज राम नवमी. चैत्र मासाची पहिली नवमी. रामजन्माचा ऊत्सव सोहळा साजरा करायची ही नवमी.

या मंगल सोहळ्यांमुळेच चैत्राला मांगय घेऊन आलेला महिना म्हणतात. गुढीपाडवा हा शुभ मुहूर्ताचा सण, रामनवमी हा रामजन्म सोहळा, हनुमान जयंतीसोहळा, अनपूर्णेचा माहेरपणाचा ऊत्सव व जाता जाता वैषाख तृतिया हा अक्षयतृतियेचा सण. सारीच मांगल्याची चैतन्याची भारलेली परंपरा.

रामाचा जन्मोत्सव हा तर ऊत्कट भक्तीचा ऊत्सव.

आजही श्रीराम जन मानसात एका विशिष्ठ स्थानी आहेत. अत्यंत भक्ती, श्रद्धा व आदराच्या भावना मनात असतात.

श्रीराम हा देव वाटत नाही तर आपल्यापैकीच एक सुख दु:ख भोगलेला वाटतो. राजा म्हणुन कूठे अहंकार, राक्षसीवृत्ती, असं दिसतच नाही.

सर्व गुणसंपन्न, प्रजेवर प्रेम करणारा, मातापित्यांची, गुरूंची आज्ञा पाळणारा, एकवचनी, एकपत्नीव्रती, ऊत्तम शासक, रामराज्य करणारा असा श्रीराम मनात रूजलेला आहे.

जिजाऊने बाळ शिवरायांना, शंभूराजांना श्रीरामाच्याच गुणसंपन्न व्यक्तिमत्वाच्या गोष्टी सांगुनच ऊत्तम संस्कार केले.

आजही कूठेही एखादी आजी आपल्या नातवंडांना श्रीरामाच्या चारित्रसंपन्नतेच्या गोष्टी सांगत ती रामासारखीच व्हावीत अशी अपेक्षा ठेवते.

एखादी आजी नातीला ….श्रीरामासारखा वर मिळू दे… असा आशीर्वाद देते. इतका श्रीरामाचा आदर्श समाजात रूजला आहे.

खरं तर जेष्ठ पूत्र म्हणुन श्रीरामच राजगादीवर बसायचे आणि प्रजेच्या मनातही हेच होते. पण मंथरा कैकयीच्या कानात शिरली, कैकयी ने दशरथाकडुन तीन वर मागुन घेतले व निर्णय फिरवला.

संशयाचा विजय झाला आणि रामास वनवास भोगावा लागला. परंतु शांतपणे कोणाचाही अपमान न करता राम सीतेसह बंधू लक्ष्मणासह वनवासात गेले.

राजवस्त्रे ऊतरवणे किती जड गेलं असेल पण त्याही पेक्षा माता पित्यांची आज्ञा पाळणे गरजेचे व म त्वाचे होते.

तिनही बंधूंवर रामाचे खुप प्रेम होते म्हणुनच भरताला राज्य देऊन राम वनवासाल गेले.

राजस सुकूमार मदनाचा पूतळा असे एखाद्या योद्ध्याचे देखणे रुप असे रामाचे वर्णन आहे पण सीता स्वयंवरानंतर राम एकपत्नीव्रती होते.

वनवासातही राम सीतेची काळजी घेत. लक्ष्मणाचे ऐकत. श्रीरामाच्या ऋजू स्वभावामूळेच तिनही माता, पिता बंधू त्याच्यावर नितांत प्रेम करत.

वनवासात जाताना या तिनही माता व पित्याचा निरोप घेऊनच ते वनवासात निघाले.तेव्हा कैकयीलाही अपार दु:ख झालेच पण स्वत: भरतही मातेवर खूपच क्रोधित झाला व त्याने निर्भत्सना केली. रामाला शोधत वनवासात जाऊन येण्यासाठी विनवणी केली. परंतु ते ऐकत नाहीत कारण पित्याची आज्ञा आहे. तेव्हा श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेऊन भरताने चौदावर्षे राज्य केले. लक्ष्मण तर सावली सारखा मागे होता. रामावर इतकी भक्ती असण्याचे कारणच त्याचे गुणच होते.

प्रजेच्या प्रत्येक विषयात राम स्वत:लक्ष घालत विचार करून प्रजाहिताचा निर्णय घेत. प्रत्येक घटकाच्या अडचणीत मदत करत. असा प्रजावत्सल राजाअसल्यानेच प्रजेचेही रामावर पूत्रवत् प्रेम होते. त्याच्याबरोबर वनवासातही जाण्यास प्रजा तयार झाली होती.

असं प्रजेचे प्रेम मिळवणं सोपं नाही.

रावणाने सीतेस फसवल्यानंतर त्यांनी पराकोटीचा विलाप केला आणि शोध घेतला.

लंकेवर चालून गेले. अशा कामी त्यांना दासोत्तम श्री हनुमान येऊन मिळाले.तो तर कपीकूळातील. जटायू हा पक्षीगण तर इवलूशी खारूताई सुद्धा रामाची मदत करायला धावले. किती हे रामावर प्रेम?आणि का असेल?

सागरावर सेतू बांधुन लंकादहन करून हनुमानाने रावणास जेरीस आणले व रामाने युद्धनिती आखुन रावणवध केला.

सीतेस परत आणले.

श्रीराम, हनुमान हे नाते आजही अजरामर आहे.

सीतेवर जितके प्रेम तितकेच दास असलेल्या भक्तांवरही केले.

सीतेवर संशयाचे आरोप काही बुद्धीहीन लोकांनी केले पण प्रजेचा मान राखणारा राजा रामाने सीतेस शुचितेची परीक्षा दूण्यास सांगितले

रामावरील प्रेमापोटीच सीतेने केलेले अग्नीदिव्य, बलीदान नावाजलं तरीही धरणीमातेने तिला पोटात घेऊन दिव्यत्व सिद्ध केले.

शेवटी हा आदर्श म्हणुनच रामायणात दाखवला गेला.

खरं तर तिने या देवस्वरूप असलेल्या रामास ऊत्कट साथ देण्यासाठीच अवतार घेतला होता.

अशा अनेक ठिकाणांहुन रामांनी कोणा ना कोणासाठी आदर्शच ठरावेत असे निर्णय घेतले.

परत अयोद्धेत येऊन आदर्श असे रामराज्य केले.

 

आजही समानता स्वातंत्र्य या हक्क मिळवलेल्या स्त्रीया मर्यादेची सीमा ओलांडून स्वैराचाराकडे वळतात, मातृत्व नकोच, जेष्ठांचा मान राखत नाहीत मग आज्ञापालन कूठले?

अशांनी आदर्श म्हणुन सीतेच्या समर्पणाचा अभ्यास करायला हवा.

बेफिकीर बेपर्वा मुलांनी रामाच्या पित्याच्या आज्ञापालन अभ्यासायला हवे.

राजकारण्यांनी मोह लोभ भ्रष्टाचार सोडुन प्रजाहितदक्ष राहिले पाहिजे.

एकंदरीतच समाजाला भानावर ठेवणे , प्रत्येकजण गुण संपन्न चारित्र्य संपन्न व्हावा, रामसेतू बांधण्यासारखी अवघड कामे प्रजा व राजा यांच्या मदतीने व्हावीत. अहिल्या, शबरी सारख्या अपराध्यांना मायेने पुन्हाआयुष्यात ऊभे करायला हवे तर शुर्पणखे सारख्यांना मृत्यूदंडच द्यायला हवा.

हे सारे भान देणारे रामायण म्हणुनच आपलेसे वाटते.

समाजाच्या मनोमनी राम ठसला आहे.

म्हणुनच या अयोद्धेच्या आदर्श राजाचा जन्म ते राज्याभिषेक हे सोहाळे प्रजा मोठ्या आनंदात चैतन्याने भारून करते. त्याचाच आनंद‌अभिमान व्यक्त करण्यासाठी वर्ष प्रारंभ भरजरी गुढी ही विजय पताका ऊंच ऊभारून, रांगोळ्या, सजावट, तोरणे इ. मधुन आनंद व्यक्त करते.

 

यावर सोनेपे सुहागा किंवा दुधात साखर म्हणावे असे कार्य अजरामर झाले ते म्हणजे …. गीत रामायण..

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकीच ठरवले गेले त्या लाडक्या .. गदिमांनी ही रामकथा ५६गाण्यात मोठ्या ऊत्कटतेने त्या त्या रसात लिहिली. ऊत्कृष्ट मांडणी, चपखल शब्द, भाषेची धाटणी यामुळे हे फारच सुंदर झाले. त्यावर बाबूजींनी आपल्या दैवी कंठातुन ते संगित व स्वरबद्ध करून रामकथा जिवंतच केली.

यामुळे गेली साठ वर्षाहुनही अधिक काळ त्याची मोहिनी समाजमनावर आहेच.

महाराष्ट्रात तर प्रत्येक जण हे रामायण जगला आहे. समाज चारित्रसंपन्न करण्यात या संपूर्ण रामायणाचा सिंहाचा वाटा आहे.

संपूर्ण रामायण हे अयोद्धेच्या रामराजाचे आदर्शच वर्णन करते. तो किती गुणी व चारित्र्य संपन्न होता हेच मनावर ठसवते.

अयोद्धेचा राजा…. आदर्श राजा.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा