*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*श्री रामनवमी*
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सांडूं नये तो
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो !!
भारत देश हा विविधतेने नटलेला आणि सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये विविध प्रकारचे सण अतिशय आनंदाने साजरे केले जातात. अशाच सणांपैकी एक म्हणजे रामनवमी… या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते.
रामनवमी भारतातल्या अनेक ठिकाणी आनंदात साजरा केली जाते. अयोध्या, सीतामढी अशा उत्तर भारतातल्या शहरांपासून ते दक्षिणेस रामेश्वरमपर्यंत श्रीरामाच्या मंदिरांमध्ये रामजन्मसोहळा साजरा केला जातो. देशात लाखो जण मंदिरांमध्ये जात रामाची पूजा करतात तर अनेकजण घरातही रामाची पूजा करतात..
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस… या तिथीस भगवान विष्णूचा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्मदिवस….
रामचा अर्थ आहे.. स्वयंप्रकाश
अंतःप्रकाश, स्वतःच्या आतील प्रकाश… याचा अर्थ आहे आपल्या आतील शाश्वत प्रकाश..! म्हणजे आपल्या आत्म्याचा प्रकाश म्हणजेच राम…
श्रीराम नवमीचा हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी राज्यवैभव सोडून वनवास पत्करणार राम आणि दुष्ट रावणाचा वध करून सज्जनांचे रक्षण करणारा प्रभू रामराजा आपल्या सर्वांसाठीच एक थोर आदर्श पुरुषोत्तम.. ..
श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन् लाडकं दैवत.. जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार… श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत…
श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देवाचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परीश्रमयुक्त असेच होते. मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले.. प्रत्येक मनुष्याने आलेल्या प्रसंगाचा धिरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनाकडे पाहून मिळते.
मर्यादा पुरूषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य…
कौटुंबिक, नैतिक, राजकीय मर्यादेत राहूनही पुरुष उत्तम कसा होऊ शकतो. यांची प्रचिती मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनामुळे येते. आदर्श डोळ्यासमोर ठेवून मानव आपली प्रगती करू शकतो. विचार आणि व्यावहारिक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना “‘मर्यादा पुरुषोत्तम”’असे म्हटले जाते.
श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.
देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला “श्रीराम जय राम जय जय राम” हा नामजप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते असे मानले जाते….
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती…
श्रीरामचरित्रात एक आदर्श स्वामी, एक आदर्श नाथ, एक आदर्श पुत्र, एक आदर्श बंधू स्वत:ला प्रजेचा स्वामी न मानता सेवक मानणारा एक आदर्श राजा कसा असावा यांचे आपणास दर्शन घडते. त्यांच्यासारखे आचरण करण्याची प्रेरणा मिळते… राम अनाथांचा नाथ आहे. दीनांचा कैवारी आहे. पतितांना पावन करणारा आहे तर शरणार्थींचे रक्षण करणारा आहे. तो तर भक्तीचा भुकेला आहे. शबरीच्या भोळ्या भक्तीवर हा रामराया प्रसन्न झाला. पतीच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या रामाच्या पदस्पर्शाने उद्धार झाला. हनुमंताची निस्सीम भक्ती त्याने ओळखली. रामनामाच्या अखंड स्मरणाने वाल्याचा वाल्मीकी झाला तर असे हे रामनामाचे माहात्म्य.. !
तर या श्रीरामाला वंदन करूया…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे @
9870451020
