You are currently viewing ‘मळगाव सखी ग्रुप’चा सामाजिक उपक्रम; कर्णबधिर शाळेला साहित्याची मदत
Oplus_16908288

‘मळगाव सखी ग्रुप’चा सामाजिक उपक्रम; कर्णबधिर शाळेला साहित्याची मदत

माऊली महिला मंडळ शिरोडाच्या दिव्यांग शाळेस वॉशिंग मशीन व कोकोनट स्क्रॅपिंग मशीन भेट; मुलांना बॉल-खाऊ वाटप

सावंतवाडी / (प्रतिनिधी) :

सावंतवाडीतील ‘मळगाव सखी ग्रुप’च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत माऊली महिला मंडळ, शिरोडा संचालित माऊली कर्णबधिर निवासी शाळा, आरोस-दांडेली येथे महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली. शाळेच्या गरजेनुसार वॉशिंग मशीन तसेच कोकोनट स्क्रॅपिंग मशीन भेट देण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना बॉल व खाऊचेही वाटप करण्यात आले.

या उपक्रमात मळगाव सखी ग्रुपचा तसेच मळगावातील इतर महिलांचा सहभाग होता. सर्वांनी एकत्र येत सामाजिक कार्याची जाणीव ठेवून हा उपक्रम यशस्वी केला.

माऊली कर्णबधिर निवासी शाळा ही गेली २२ वर्षे दुर्गम भागात कार्यरत असून कर्णबधिर व मतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन करण्याचे काम करत आहे. सध्या शाळेत कर्णबधिर व मतिमंद अशा अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून त्यांच्या निवास, अन्न, आरोग्य व इतर गरजांचा खर्च संस्था स्वबळावर उचलत आहे. शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील या मुलांसाठी ही संस्था आधारवड ठरत आहे.

मुलांना बोलता येत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि “थँक यू” म्हणण्याचा प्रयत्न उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. या भावनिक क्षणामुळे सर्वांनाच समाधान मिळाले.

या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने ‘मळगाव सखी ग्रुप’चे शतशः आभार मानण्यात आले असून समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा