You are currently viewing राजकारणासाठी बदनामी नको; केसरकरांवरील आरोपांवर संजू परबांचा पलटवार
Oplus_16908288

राजकारणासाठी बदनामी नको; केसरकरांवरील आरोपांवर संजू परबांचा पलटवार

नार्वेकर-ठाकरे संबंधांवर चौकशीची मागणी, काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही प्रत्युत्तर

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

आमदार दीपक केसरकर हे देवभक्त असून एखादे मंदिर दिसल्यानंतर ते कुठेही थांबतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ राजकारणासाठी त्यांची नाहक बदनामी करू नये, असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला.

ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आल्यानंतर परब यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टीळवे, उत्कर्षा गावकर, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कॅप्टन खरात यांना पाणी दिले होते, तसेच मिलिंद नार्वेकर यांचे त्यांच्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आपल्या नेत्यांवरही त्यांनी बोलावे. उद्या होणाऱ्या मोर्चात नार्वेकर यांच्या चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही परब यांनी दिला.

राऊळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार केसरकर यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे, असा आरोप करत परब म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत चोर म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला चोर म्हणणे योग्य नाही. त्यामुळे कोण आला, कोण गेला हेही स्पष्ट नाही.

त्यामुळे टीका करण्याऐवजी तुमच्या पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खरात यांच्याशी संबंध आहेत, हे उघड करावे. तसेच उद्याच्या मोर्चात त्यांचीही चौकशी करण्याची मागणी करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका केली होती. यावर बोलताना परब म्हणाले की, ज्यांना स्वतःला १६ मते पडली आणि पराभव झाला, त्यांच्यावर आम्ही बोलणार नाही. तब्बल दोन वेळा डिपॉझिट जप्त झाले अशा व्यक्तींवर काय बोलावे, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा