You are currently viewing कौशल्य विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व: रवींद्र दांडगे 

कौशल्य विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व: रवींद्र दांडगे 

 

माजी राज्यपाल व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री रा.सू. गवई, खासदार डॉ.अनिल बोंडे व माझ्याकडे ज्यांनी अविरत सेवा दिली. निष्ठावंत बनून सेवा दिली. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही. त्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे नाव आहे रवींद्र दांडगे. अमरावतीच्या यशोदा नगर भागात राहणारा हा आमचा कार्यकर्ता आहे. अमरावतीच्या पत्रकारितेत व सामाजिक जीवनात व बहुजन चळवळीत आता रवींद्र दांडगे हे नाव सर्व परिचित झाले आहे.

रवी जे काम करतो ते मन लावून आणि स्वतःला झोकून देऊन करतो.

विद्यार्थी जीवनात तो माझ्याकडे आला. माझे कामकाज पाहू लागला. नंतर तो गवई परिवाराशी जोडल्या गेला आणि डॉ.अनिल बोंडे कृषिमंत्री असताना त्यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून त्याने काम केले. या तीनही ठिकाणी त्याने निष्ठेने सातत्याने परिश्रमपूर्वक जे काम केले त्यामुळे त्याने स्वतःचा पाया मजबूत केला आहे .इतका की अमरावती जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,साहित्य, शैक्षणिक जगतात त्याचे नाव सन्मानाने घेतले जाते.

तसा रवी अमरावतीच्या इर्विन चौकातील मोर्शी रोडवरील संत गाडगे बाबा आयटीआयमध्ये गटनिदेशक या पदावर कार्यरत आहे. तिथे पण किमान कौशल्यावर आधारित अनेक उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन त्याने महाराष्ट्र शासनाच्या गौरवात भरच टाकली आहे. आपले शासकीय काम निष्ठेने करणे आणि उरलेला वेळ समाजकार्यासाठी देणे हे त्याच्या जीवनाचे समीकरण होऊन गेले आहे. विशेष म्हणजे त्याला या कामासाठी मानधनाची किंवा आर्थिक लाभाची कुठलीच अपेक्षा नसते.

रवी आमच्याकडे आला त्याला आज 46 वर्षाचा कालखंड झाला आहे. पण तो आज आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. इतका तो आमच्याशी एकरूप होऊन गेलेला आहे.

परवा त्याचे एक काम अडले होते. ते करणे जिकरीचे होते.

रवीला माहीत होते हे काम काठोळे सरच करू शकतात. तो माझ्याकडे आला .त्याने कामाचे स्वरूप सांगितले. मला त्याची तळमळ लक्षात आली. अमरावतीहून काम होण्यासारखे नव्हते. मी सरळ मुंबईला मंत्रालय गाठले. तिथले वरिष्ठ सनदी अधिकारी माझे जिवलग मित्र आहेत. त्यांना काम सांगितले. अर्थातच काहीच तासांमध्येच रवींद्रचे काम झाले. रवींद्रने मिशन आय ए एस ला आतापर्यंत जी अविरत सेवा दिली त्याचे फळ त्याला मिळाले.

तो स्वतः लेखक आहे. कवी आहे. पत्रकार आहे .पत्रकारितेचा उपयोग तो कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजनांचा अभ्यास करून त्याचे प्रसारण व प्रसिद्धी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे करीत आहे. वेळोवेळी या कामासाठी कौशल्य विकास विभागाने त्याचा गौरव देखील केलेला आहे.सोबत तो संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याचा एक कथासंग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. आज कौशल्याला फार महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या तीस वर्षाच्या काळात त्याने जे विद्यार्थी घडविले त्यांना स्वतः च्या पायावर उभे केले. आय टी आय पास झालेल्या मुलांच्या व्यवसायासाठी बँकेतून मुद्रा लोन मिळविण्यापासून ते त्याला स्टार्टअप उभे करण्यापर्यंत रवी त्यांना मदत करतो. संपूर्ण महाराष्ट्रात त्याने अशी मुलं उभी केली आहेत जी आज स्वतः च्या पायावर उभी आहेत. अशा मुलांच्या यशोगाथेवर आधारित “कौशल्याची यशोगाथा” हे प्रेरणादायी पुस्तक सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्याचा लेखक रवी हा आहे.हे प्रेरणादायी पुस्तक राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस व कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभातजी लोढा यांचे हस्ते करण्याचा त्याचा मानस आहे.

सध्या त्याचे वाचन व अभ्यास त्याच्या आडनावाप्रमाणेच दांडगे आहे.

अमरावती शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक दैनिकांचे संपादक, पत्रकार त्याचे वैयक्तिक घनिष्ठ मित्र आहेत याला कारण रवी जेथे जातो तिथे आपली एक चांगली छबी तयार करूनच परत येतो.

खासदार डॉ. अनिल बोंडे हे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री असताना मी रवीच्या नावाची शिफारस केली .त्याला जनसंपर्क अधिकारी नेमावे असे मी डॉ.बोंडे साहेबांना सुचविले. त्यांचे माझे घनिष्ठ संबंध लक्षात घेता त्यांनी तात्काळ या प्रस्तावाला मान्यता दिली. जनसंपर्क अधिकारी या पदाला रवीने न्याय दिला. डॉ.बोंडे साहेब जोपर्यंत पदावर होते तोपर्यंत रवीने त्यांच्या प्रसिद्धीची बाजू तर सांभाळलीच पण त्याचबरोबर त्यांच्याकडे येणारे जाणारे सर्वसामान्य लोक यांची देखील त्यांनी डॉ.बोंडे साहेबाप्रमाणेच काळजी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की साहेबांची समाजभिमुखता माध्यमातून अधिक प्रखरपणे व्यक्त झाली.

आज आमच्या मिशन आयएएस, डॉ.पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी या संस्थांचे प्रसिद्धीचे काम तो पाहतो. बातमी असो वा लेख त्याला नियतकालिकाकडे पाठविण्यासाठी जे योग्य संस्कार करावे लागतात ते कसब रवीला गवसले आहे. त्यामुळे त्याने तयार केलेली बातमी किंवा त्याने संपादित केलेला लेख हे अतिशय आकर्षक व चित्तवेधक असतात. त्याने दिलेले शीर्षक देखील पाहण्यासारखे असते.

रवीचे वडील तहसीलदार होते ते अमरावती विभागातच कार्यरत होते. कर्तव्यदक्ष तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचा ठसा रविवर उमटला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रवीचे व्यक्तिमत्व घडत गेले. त्याची पत्नी कावेरी ही देखील आयटीआयमध्येच कार्यरत आहे. आपल्या पतीला त्याच्या सामाजिक कार्यात ती खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून साथ देत आहे. त्यामुळे रवी हे सर्व करू शकतो.

अमरावतीच्या शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विश्वात असणारा रवी या महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो सेवानिवृत्त होत आहे याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही इतके त्याने स्वतःचे आरोग्य सांभाळले आहे. मनाचेही आरोग्य सांभाळले आहे. सामाजिक बांधिलकीही जपली आहे .अशा या रवीला आमच्या मिशन आय ए एस परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

=============

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा