*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*लोप पावत चाललेली नाती..*
गुढी पाडवा आला की मला लहानपणी फार मजा
वाटायची. आमचा सालदार एक उंच बांबूची काठी धुवून पुसून आणायचा. घरात माणसं कमी
तरी गडबड खूप उडायची. गडी लिंबाची फांदी तोडून आणायचा. घरात होळीचे हार कंगन असतंच. आई वडील भल्यापहाटेच स्नानादी कर्मे
आटोपून तयार असत. नऊवार साडीतील कपाळाला आडवी कुंकवाची चिरी लावलेली आई लक्ष्मी सारखी दिसायची. वडिलांचे पांढरेशुभ्र खादीचे कपडे, डोक्यावर खादीचीच
पांढरी टोपी असे ते दोघे अंगणात जाऊन हारतुऱ्यांनी व पैठणीने सजलेल्या गुढीची पुजा
करत व मग गुढी दिमाखात अंगणात विराजमान
होत असे. अंगणात सडा रांगोळीच्या पार्श्वभूमीवर गुढीचे पावित्र्य आणखीणच डोळ्यात भरत असे.
इथून पुढे आईची खरी परीक्षा सुरू होई. होय,
गुढीपाडवा म्हणजे पुरणाच्या मांड्यांचा घाट नि
५/१० तरी पानं जेवायला असत.एवढ्या लोकांचा
पुरणाचा व कटाच्या आमटीचा स्वयंपाक म्हणजे
आईची कसरत असे. जोडीला पापड कुरडया, गरमागरम भजी, भात व कटाची आमटी असा जोरदार बेत असे. शिवाय पुरणपोळीबरोबर गव्हाची किंवा तांदळाची भरपूर दुधातली खीर
असेच.
एवढा मोठा स्वयंपाक, तो ही चुलीवर, मसाल्याचे
वाटण पाट्यावरवंट्यावर. मी तर लहान होते. फक्त गंमत बघत असे. १०- १०/३० पर्यंत स्वयंपाक रेडी करून मग सालदार ओळीने डबल
पाटं मांडत असे. काचेच्या ग्लासात उद् बत्यांची
चूड पेटवून फुंकर मारून घमघमाट सुटताच त्या
पाटाजवळ ठेवल्या जात. पाण्याची बादली, टॅावेल साबण दाराजवळ ठेवताच मंडळी पाटावर
स्थानापन्न होत. वडील मग एका मोठ्या पाटावर
देवासमोर गुढी उतरवून ठेवत. आमच्याकडे दिवसभर गुढी ठेवण्याची प्रथा नाही. मग पहिला नैवेद्य गुढीला दाखवून त्या भोवती पाणी फिरवताच गुढीला नमस्कार करून मंडळी जेवायला बसताच पुरणपोळी व खिरीवर तूप
पडताच त्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेत मंडळी
जेवणावर आडवा हात मारत असत.सावकाश बादलीतल्या पाण्याने हात धुवून झोऱ्यावर बसत
तक्के पाठीशी घेत पानाचा डबा पुढे येई व मग
विडे बनवून पान खाणे होई.
हे सारे मी अशासाठी सांगितले की, सणवाराला चार पाहुणे व जवळची मंडळी असल्याशिवाय
सण होतच नसे. ही स्थिती प्रत्येकच सणाला असे.गहू ओलावून आई वस्त्रगाळ पिठी तयारच
ठेवत असे. ते ही गहू जात्यावर दळून. ५/१० मंडळी पंगतीला असल्याशिवाय वडिलांचे समाधानच होत नसे.
उन्हाळ्याची सुटी लागताच आमची आमळथ्याची
आत्या चार तरी नातवंडांना बैलगाडीत घेऊन आमच्या घरी निदान १५/२० दिवस तरी मुक्कामाला येत असे. मग काय? दररोज आत्या
बाईंसाठी पाहुणचाराचा घाट असे. पाटवड्या, वरण, पुरण, शेवया, भजीची आमटी असे रोज पक्वान्नं बनत असे. आई बाईसाहेबांच्या पाहुणचारात कसलीही कसर बाकी ठेवत नसे.
मला एकूण सख्ख्या व चुलत मिळून सहा आत्या
होत्या. कुणीनकुणी आमच्या घरी मुक्कामाला
असतंच. वर्षभर असा कार्यक्रम चालूच असे व
हे सारे आनंदाने, प्रेमाने कंटाळा न करता होत असे. एक आत्या आम्हाला खूप गोष्टी सांगायची.
सर्वच आत्या आम्हाला आवडायच्या. आई त्यांना
साडीचोळी बांगड्या व धनधान्य शिदोरीसह त्यांची मानाने पाठवणी करायची. सुखदु:खाला
हक्काने त्यांना बोलवायची व त्याही आनंदाने येत असत.
आत्यांची मुले गृहस्थाश्रमी झाल्यावरही सतत त्यांचे मामाकडे येणेजाणे होते. खूप सौहार्दाचे
संबंध माझे आईवडील होते तोवर त्यांच्याशी होते. मामांकडे तर खेड्यात शाळा नसल्यामुळे,
आम्ही सारी भावंडे त्यांच्याचकडे शिकलो. ते ही
दोन खोल्यांच्या घरात. त्यामुळे अजूनही ते असे
पर्यंत आमचे त्यांच्याशी प्रेमाचे नाते होतेच तसे
आज त्यांच्या मुलांशीही आहे. हे आमच्या पिढीचे
मुरलेले संस्कार होते.
आज मात्र सारेच चित्र पालटले आहे. कुणीच कुणाला हवासा का वाटत नाही? कुणाकडे जाण्याचे आपण का टाळतो? येणारा नकोसा
वाटतो का? असल्यास का? मी व माझी दोन
मुले एवढेच आपले अस्तित्व उरले आहे काय?
असल्यास एवढा नात्यांचा संकोच का झाला?
आईवडिल सुद्धा नकोसे झाले. त्यांच्यासाठी
वृद्धाश्रम आले. पंजाबी, जैन, मारवाडी समाजात वडिलधाऱ्यांना मानाने वागवतात. मग
ते आपल्याला का जमत नाही? असंख्य प्रश्नांचा
डोक्यात कल्लोळ झाला आहे. प्रत्येकाने विचार
करण्याची गरज आहे. प्रत्येकालाच वाटते मी बरोबर आहे पण एका नाण्याला दोन बाजू असतातंच. कुणीच १००/- टक्के बरोबर असू
शकत नाही त्याला वाटले तरी.
हो, लोकसंख्या वाढते पण त्यात मी कुठे असतो?
चुकतो तो समोरचा ना, मी कुठे चुकतो?
दारूड्या समोरचा असतो. मी घरात सभ्यपणे
रिचवतो व झोपतो. मग मी दारूडा कसा? हे सारे
प्रश्न आपण आपल्या अंतर्मनाला विचारायला हवेत. मग आपण का आणि कुठे चुकतो आहोत
या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतीलंच, शिवाय
नात्यांचा संकोच का झाला आहे याचाही आपण
गांभिर्याने विचार करायला हवा. बऱ्याच गोष्टी
इतरांपासून लपवण्यासाठी आपण बंद दाराआड
लपतो आहोत का? आपली कमजोरी उघड करायची आमची हिंमत होत नाही का? मोकळे
पणाने आपल्या अपयशाचीही चर्चा करायला
आपण का घाबरतो? चर्चा केली तर मार्ग सापडतात. पूर्वी कुठे अशी लपवाछपवी होती.
लोक एकमेकांना कोणत्याही संकटात मदत
करत असत.कामे ही एकमेकांच्या मदतीनेच
होत असत.
आपले कुठे चुकते याचा आपणच शोध घ्यायला
हवा,त्यात शक्य झाल्यास सुधारणा करायला हवी.हो, दुसऱ्यावर ढकलून कसे चालेल? आपल्या भोवती आखलेले वर्तुळ आपणंच भेदायला हवे ना? दुसरे कोण भेदणार?
चला मग.. सर्वांनी मिळून शोध घेऊ या..
दुरावलेल्या नात्यांचा.. अगदी मनापासून बरं..
प्रा. सौ. सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)
