सध्या महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव असलेले श्री विकास खारगे यांचा माझा पहिला परिचय 26 वर्षांपूर्वी झाला. तेव्हा ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी होते. तत्पूर्वी ते जेव्हा आयएएस झाले तेव्हाही त्यांच्या बातम्या मी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्या होत्या. सर्वसामान्य परिस्थितीतील श्री विकास खारगे यांनी आयएएस या परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश संपादन करून आतापर्यंत अतिशय समृद्ध अशी वाटचाल केलेली आहे.
12 मे 2000 रोजी आमच्या अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीच्या मिशन आयएएस या प्रकल्पाचे उद्घाटन श्री विकास खारगे यांच्या हस्ते अमरावतीच्या विद्यापीठा जवळील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालयात संपन्न झाले. तेव्हापासून तर आतापर्यंत त्यांचे माझे ऋणानुबंध कायम होते आहेत आणि राहतील.
विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावीत यासाठी आम्ही आताचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार यांच्या मार्गदर्शनाने डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीची स्थापना केली .त्यांची भेट झाली नसती तर कदाचित ही अकादमी उभी राहिली नसती. उदघाटनाच्या कार्यक्रमाला श्री विकास खारगे हे आले. विशेष म्हणजे माझ्या घरी खाली जमिनीवर बसून त्यांनी जेवण केले. एक आय ए एस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा एखाद्या अपरिचित घरी जमिनीवर बसून जेवण केले तेव्हा तो माणूस सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावणारा असतो हे समीकरण ठरून गेले आहे आणि त्याला श्री विकास खारगे हे पात्र ठरले आहेत.
साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनामध्ये स्वतःची अमीट अशी छाप त्यांनी रुजविली आहे. सर्व सनदी अधिकाऱ्यांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये श्री विकास खारगे यांचे नाव आदराने सन्मानाने घेतले जाते .साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही तत्व प्रणाली त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरविली आहे .खरं म्हणजे हे कठीणच काम असते .पण ही तारेवरची कसरत खारगेसाहेबांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना केव्हाही एसएमएस करा. सर मला ताबडतोब उत्तर देतात. मग अगदी तो रात्री बारा वाजता अतिशय महत्त्वाच्या कामासाठी केलेला असला तरी.
परवा मी साहेबांना एक छोटेसे काम सांगितले. काम खूपच लहान होते .पण ते साहेबच करू शकत होते. साहेबांनी ते काम केले आणि मला सांगितले माझ्या वडिलांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्याचे पीडीएफ फाईल तुमच्याकडे पाठवीत आहे. त्यांच्या वडिलांचा 96 वा वाढदिवस नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीला साजरा झाला होता. साहेबांनी मला ते पुस्तक पाठवगले .मी ते लगेच वाचून काढले आणि मला त्यांच्या वडिलांना श्री शंकरराव खारगे यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. यापूर्वी त्यांना मी भेटलो होतो .पण पुस्तक वाचून माझा आदर अजून वाढला आणि या माणसाला आपण ताबडतोब भेटले पाहिजे असे मी ठरविले. त्याप्रमाणे परवा मी इचलकरंजीला साहेबांच्या घरी जाऊन आलो.
साहेबांच्या वडिलांना भेटलो. 96 व्या वर्षी देखील ते बाहेर व्हरांडात पुस्तक वाचत बसले होते. मागे पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी माझे त्या इचलकरंजी भागात कार्यक्रम ठेवले तेव्हा देखील मी खारगे साहेबांकडे गेलो तर त्यांचे वडील तेव्हा देखील पुस्तकच वाचत होते.
मुख्य सचिवांचे घर किती साधे असू शकते याचे एकमेव उदाहरण म्हणजे श्री विकास खारगे हे आहेत. मलाच नवल वाटले. साहेब महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव आहेत. पण सर्वसामान्य माणसे जसे राहतात तसे त्यांचं घर आहे. या घराला अजून तरी अपर मुख्य सचिव या पदाचा अहंकारी स्पर्श झालेला नाही. हातमागासाठी लागणारे यंत्र तसेच हातमागासाठी लागलेले रोल व इतर साहित्य घराच्या आजूबाजूला आहे. अगदी साधे शेतकऱ्याचे घर शोभावे असे त्यांचे घर मी टिपले.
वडिलांचे 96 वय झाले तरी ते चालू शकतात. फिरू शकतात. ऐकू शकतात .फोन करू शकतात .स्वतःहून उठू शकतात मोटरसायकल बसू शकतात. मला वाटते या कुटुंबाने आपल्या प्रारंभिक अवस्थेमध्ये जे संघर्षमय जीवन कंठले आहे आणि त्यामुळे त्यांच्या जो पाया मजबूत झाला तो आजही खंबीर आहे आणि राहणारही आहे.
मी इचलकरंजीला जाणार आहे हे साहेबांना कळविले होते. माझ्या स्वागतासाठी त्यांचे बंधू पनवेलवरून इचलकरंजीला आले आणि त्यांनी मला विनंती केली की सर अगोदर मला पोहचू द्या नंतर आपण या. मी सांगलीला आमचे सन्मित्र व सनदी अधिकारी श्री विशाल नरवाडे यांच्याकडे थांबलो. त्यांनीच माझे इचलकरंजीला नेण्या-आणण्याची व्यवस्था केली. खारगेसाहेबांचे घर पाहून वडील पाहून भाऊ पाहून आणि त्यांच्या मनात माझ्याविषयी असलेली आत्मीयता जिव्हाळा प्रेम पाहून मलाच गहिवरून आले. खरं आज अशी माणसं दुर्मिळ झालेली आहेत. पण ही माणसे मला इचलकरंजीला खारगे परिवाराच्या निमित्ताने प्राप्त झाली.
साहेब वेगवेगळ्या पदावर गेले. पण प्रत्येक वेळेस ते त्यांचे नंबर मला कळवीत गेले. अमरावतीला आले की ते आवर्जून मला फोन करीत होते आणि आजही करतात. आजच त्यांचा सकाळी फोन येऊन गेला. माझे जावई कर्नल सारंग व कन्या डॉ.प्राची ऑपरेशन सिंदूरनंतर राजस्थानवरून अमरावतीला माझ्याकडे आलेले. त्या गडबडीत मी तो फोन घ्यायला विसरलो. रात्री माझ्या लक्षात आले. मी लगेच साहेबांना फोन केला. अपर मुख्य सचिवांचा फोन बारा तास न उचलणे हेच मला बरेचसे बोचत होते. साहेबांशी बोलणे झाले .साहेबांनी कोणतीही तक्रार केली नाही. उलट माझ्या मुलीची व कर्नल जावयांची आस्थेने चौकशी केली. याला म्हणतात विनयशीलता.
खारगेसाहेबांचे एक अजून वैशिष्ट्य हे आहे की ते दरवर्षी गांधी जयंतीला आणि गांधी पुण्यतिथीला स्वतःसाठी खादीचे कपडे खरेदी करतात. आजकाल सर्वत्र फॅशन आलेल्या आहेत. मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यांची वस्त्रे परिधान करण्याची शर्यत लागली आहे. या शर्यतीत मात्र खारगेसाहेब नाहीत. खादीच्या कपड्यामुळे त्यांना जे समाधान मिळते ते मला असं वाटते ब्रँडेड कंपन्यांच्या वस्त्रांमध्ये नाही.
साहेबांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते बासरी वाजवितात. बासरीचे सुर हे नेहमी सौम्यच असतात .कधीही कर्कश होत नाहीत आणि त्यामुळेच की काय खारगेसाहेबांनी वाजविण्यासाठी बासरी हे वाद्य निवडले आहे. त्यांना जेव्हा केव्हा सवड मिळते तेव्हा ते बासरी वाजवितात आणि सोशल मीडियावरही टाकतात.
मागे जेव्हा उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली तेव्हा तिथल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने जर कोणाची निवड केली असेल तर ती विकास खारगे यांची. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये ते उत्तराखंडला गेले. त्यांनी महाराष्ट्रीयन पर्यटकांची इतकी सुंदर व्यवस्था केली आणि त्या सर्वांना सुखरूप महाराष्ट्रात आणले त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या परत मुंबईला आल्यानंतर गौरव केला.
साहेबांचा मुलगा मनीष आज सोशल मीडियावर खूप नावलौकिक मिळवित आहे. फक्त एक दोन मिनिटाचे व्हिडिओ त्याचे जगभरात पोहोचले आहेत. सरांचे दोन्ही चिरंजीव मी सरांना जेव्हा त्यांच्या यवतमाळच्या बंगल्यात भेटलो तेव्हा खूपच लहान होते.
आता तर 26 वर्षाचा कालखंड निघून गेला आहे. मी नियमितपणे सरांना मुलांना वाढदिवसाचे पत्र पाठवितो.खारगेसाहेब म्हणतात काठोळे तुम्ही एकमेव असे मित्र आहात की मला न चुकता अभिनंदन करता.
चांगल्या माणसांचे नेहमी गुणगानच करायचे असते. आणि त्यासाठी श्री विकास खारगे हे पात्र आहेत हे वेगळे सांगणे न लगेच. सर्वसामान्य परिस्थितीतून आलेला हा माणूस आज महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिवपदापर्यंत पोहोचला आहे .त्यातच त्यांच्या यशाचे रहस्य दडलेले आहे. एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही विनयशील बोलणे विनायशील वागणे तत्परतेने काम करणे रात्र असो वा दिवस असो सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणे हे काम ते अव्याहतपणे करीत असतात आणि करीत राहतील. अशा या विशाल हृदयाच्या माणसाला त्यांच्या 17 मार्चच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प महाराष्ट्र
9890967003
