परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी माजी सैनिकाच्या पाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याणकारी निधी योजनेचा लाभ
सिंधुदुर्गनगरी
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गमार्फत विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये व अवलंबितांना शैक्षणिक, स्वयंरोजगार व पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या आर्थिक सहाय्याचा लाभ दिला जातो.
याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील गावराई येथील माजी सैनिक विठ्ठल जनार्दन काळे यांचे सुपुत्र कु. गणेश विठ्ठल काळे हे किर्गिझस्तान येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधीतून 1 लाख रुपये इतक्या आर्थिक सहाय्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.
या धनादेशाचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या हस्ते 24 जुलै 2026 रोजी करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक लक्ष्मण कोळी, कल्याण संघटक आण्णासाहेब माने तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मच्छींद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये व अवलंबित यांनी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, स्वयंरोजगार व पुनर्वसन आदी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच योजनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अथवा दूरध्वनी क्रमांक 02662-228820 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
